ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना आज मोठे यश आले आहे. पुलवामानजीक एका सेंट्रो गाडी मध्ये आयईडी (इंम्प्रोवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) स्फोटक बसवण्यात आले होते. याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाल्यावर, जवानांनी लगेचच कारवाई करत गाडी ताब्यात घेतली आणि त्यामधील आयईडी डिफ्युज केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी एकत्र येऊन ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी पुलवामातील राजापूरा रोडजवळ शादीपुर येथे पकडण्यात आली. या पांढऱ्या सेंट्रो कारला दुचाकीची नंबर प्लेट होती. या गाडीची कठुआमध्ये नोंदणी केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचा तपास केला व त्यानंतर बॉम्बचा शोध घेण्यात आला.
सुरवातीला एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. सुरुवातीला करण्यात आलेल्या गोळीबारामुळे तो गाडी सोडून पळून गेला.
दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एनआयए कडे सोपविण्यात आले आहे.









