भारतीय सेनेच्या सूत्रांची माहिती, तरूणांचे हिंसाचाराकडे आकर्षण झाले कमी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जानेवारी 2021 पासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. त्याचप्रमाणे खोऱयातील युवकांचे हिंसाचारासंबंधीचे आकर्षण कमी होत आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये समाविष्ट होणाऱया तरूणांची संख्या घटत आहे, अशी माहिती सेनासूत्रांनी दिली आहे.
2020 च्या संपूर्ण वर्षात काश्मीर खोऱयातील 167 युवक दहशतवादी संघटनांमध्ये समाविष्ट झाले होते. तथापि, यावर्षी पहिल्या जवळ जवळ तीन महिन्यांमध्ये केवळ 20 युवक दहशतवादाकडे आकर्षित झाले. हाच कल कायम राहिला तर 2021 या एका वर्षात दहशतवादी संघटनांमध्ये समाविष्ट होणाऱया युवकांची संख्या 80 च्या आसपास असेल. ही संख्या मागच्या वर्षीच्या संख्येपेक्षा साधारणतः 80 ने कमी असेल, अशी माहिती देण्यात आली.
मन वळविण्यात यश
2021 मध्ये दहशतवादी संघटनांमध्ये समाविष्ट झालेल्या 20 काश्मिरी युवकांपैकी किमान 8 जण सुरक्षा सैनिकांकडून ठार झाले आहेत. तर 9 बेपत्ता आहेत. याशिवाय 15 युवकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करण्यात सैनिकांना यश आले. आता हे युवक मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहेत. आणखी अशा युवकांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दहशतवादी हल्ल्यांमध्येही घट
नव्या वर्षात खोऱयातील दहशतवादी हल्ल्यांमध्येही घट झाली असून ती साधारणतः 25 टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सेनेने स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी आणि त्यांचे दहशतवादाविरोधात प्रबोधन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून स्थानिक संघटना, युवक संघटना व ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला जात आहे. दहशतवादामुळे कोणाचेही भले होत नाही, हे त्यांना पटवून दिले जात असून हळूहळू अनेकांच्या मानसिकतेत परिवर्तन होत आहे. सेनेला याकामी स्थानिकांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे अधिकारी आणि सैनिक यांच्या उत्साहातही वाढ होत आहे. काश्मीर खोरे दहशतवादमुक्त करण्यासाठी शस्त्रबळाप्रमाणेच मनपरिवर्तनाच्या मार्गाचाही उपयोग केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.









