ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूच्या सेंट्रल जेल कोट भलवालजवळील तलाव परिसरात पाकिस्तानी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क येत असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वीही पाकिस्तानी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क भारतीय हद्दीत येत होते. मात्र, आता सीमारेषेपासून 11 किमीपर्यंतच्या भागात हे नेटवर्क येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ, राजौरी, कठुआ, सांबा जिल्ह्यांची सीमा आणि एलओसीमध्ये पाकिस्तानी मोबाईल कंपनी, रेडिओ आणि टीव्ही चॅनल्सचे नेटवर्क चार ते पाच किलोमीटरच्या परिघात आहे. या सीमेवर भारतीय भारतीय मोबाईल कंपन्याचे नेटवर्क फार कमी आहे.
दरम्यान, पाकिस्तान जाणीवपूर्वक आपल्या रेडिओ आणि टीव्ही चॅनल्सचीही फ्रिक्वेन्सी वाढवत आहे. जेणेकरून सीमेभोवती राहणाऱ्या लोकांना या पाकिस्तानी वाहिन्यांवरून भारतीय लष्कराच्या विरोधात आणि काश्मीरबद्दल होणारा दुष्प्रचार पाहता येईल.









