ऑनलाईन टीम / जम्मू :
भक्त गणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वैष्णव देवी यात्रा उद्यापासून म्हणजेच 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आठ पुजारी आणि 11 श्राइन बोर्डच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर आता एसओपीमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार आता पहिल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी केवळ 2000 भाविक सहभागी होणार आहेत.
या यात्रेत जम्मू काश्मीरमधील 1900 आणि अन्य राज्यातील 100 लोकं असतील. याआधी 5 हजार लोकांना सहभागी करून घेण्याची तरतूद करण्यात आली होती. बैटरी वाहन, यात्री रोपवे आणि हेलिकॉप्टर सेवा सुरळीत चालेल. कोरोना संकटामुळे ही यात्रा 18 मार्च पासून बंद होती.
श्री माता वैष्णव देवी श्राइन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले की, यात्रेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. दुसरे प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या रेड झोन जिल्ह्यातील लोकांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट बरोबर ठेवणे बंधनकारक असेल.
पुढे ते म्हणाले, यात्रा सुरक्षित करण्यासाठी बैटरी वाहन, यात्री रोपवे आणि हेलिकॉप्टर या सर्व सेवा या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू केल्या जातील. गर्दी होऊ नये यासाठी अटका आरती आणि विशेष पूजेमध्ये भाग घेण्यास परवानगी दिलेली नाही. भाविकांच्या सुविधेसाठी लॉकर सुविधा सुरू असेल मात्र, कंबल स्टोर बंद असतील.
यावर्षी यात्रेमध्ये घोडा, खेचर आणि पालखी सुविधेस परवानगी नसेल. तसेच 10 वर्षापेक्षा कमी आणि 60 पेक्षा जास्त वय असलेले लोक, गर्भवती महिला आणि आजारी लोकांना यात्रेत सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे.