दहशतवाद्यांना तडाखा, घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, पाटील मूळचे तुरुकवाडीचे
सुधाकर काशीद/कोल्हापूर
जम्मूत दहशतवाद्यांनी गत गुरुवारी टोलनाक्यावरून घुसखोरीचा प्रयत्न केला. अर्थात पोलीस व भारतीय सेनेच्या सुरक्षा यंत्रणेने तो मोडून काढला. यानिमित्ताने दहशतवाद्यांना मोठा तडाखा बसला. सुरक्षा यंत्रणेचे हे यश निश्चितच सामूहिक. पण, या मोहिमेत सक्रिय सहभागी राहिले जम्मूचे पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील. हे पाटील मूळचे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावचे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे घडलेली ही घटना जरूर जगभर पोहोचली. पण, कोल्हापूरकरांच्या दृष्टीने या घटनेला एक वेगळी शौर्याची किनार आहे. कारण अतिरेक्यांचा खात्मा करणाऱया या मोहिमेत एका कोल्हापूरच्या सुपुत्राचा सहभाग आहे. गुरुवारी पहाटे या टोल नाक्यावर अतिरेकी ट्रकमधून आले त्यांना अडवताच त्यांनी गोळीबार सुरू केला. ज्या जिल्हÎाच्या हद्दीत ही घटना घडली त्या जिल्हÎाचे पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील आहेत. ते त्यांच्या यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले. भारतीय सेनेची यंत्रणाही सज्ज होतीच. सेना व पोलीस या दोघांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांची ही घुसखोरी मोडीत काढून चौघा अतिरेक्यांचा खात्मा केला.
या मोहिमेत जरुर प्रत्येक जवानाने जीवाची बाजी लावली. त्यात श्रीधर पाटील अग्रभागी होते. गत आठवडÎात पाकिस्तानी हल्ल्यात कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे संग्राम पाटील हे दोन जवान धारातीर्थी पडले या पार्श्वभूमीवर श्रीधर पाटील यांनी जणू या मोहिमेत सहभागी होऊन दहशतवाद्यांचा बदला घेतला.
श्रीधर पाटील यांचे गाव शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी. वारणा नदीच्या काठावरच्या या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. मूळातच बेडर वृत्तीचे श्रीधर सैन्यात भरती झाले. पण, तेथे हजर होण्यापूर्वी त्यांनी आयपीएस परीक्षेसाठी नेटाने प्रयत्न करण्याचा निर्धार केला. 2008 साली ते आयपीएस झाले. गावातून त्यांची मिरवणूक निघाली. श्रीधर पाटलांची आई अशिक्षित. तिला कळेना पोराची मिरवणूक का काढली? पोरगा आयपीएस झाला हे त्या माऊलीला कळालेच नाही. पोरगा साहेब झाला याचा आनंद मात्र तिच्या चेहऱयावर झळकला.
आयपीएसनंतर श्रीधर पाटील यांनी जम्मू काश्मीरमध्ये सेवेसाठी प्राधान्य दिले व त्यांची नियुक्ती राजुरी येथे पोलीस अधीक्षक म्हणून झाली. गेली बारा वर्षे ते धगधगत्या जम्मूत आहेत. प्रत्येक मोहिमेत त्यांचा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर `श्रीधरसाब’ म्हणून स्थानिकात त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा आहे. कोठेही पेचप्रसंग निर्माण झाला की तेथे श्रीधर पाटील यांनाच मार्ग काढण्यासाठी बोलावले जाते एवढा त्यांचा या परिसरात दबदबा आणि आदर आहे.
दिवाळीला एक दिवसासाठी ते तुरुकवाडीला आले होते. आईला भेटले. दिवाळीची ओवाळणी करुन परत गेले. आणि गुरुवारी जम्मूत झालेल्या चकमकीत अग्रभागी राहिले या चकमकीत त्यांचा बॉडिगार्ड जखमी झाला. ते स्वतः किरकोळ जखमी झाले. पण, आपल्या सर्व सहकाऱयांसोबत दहशतवाद्यांचा खात्मा करुन मोहीम फत्ते करुनच ते थांबले.
कोल्हापुरातला एक तरुण जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस अधीक्षक पदावर गेली 12 वर्षे आहे. धगधगत्या काश्मीरमध्ये तो अंतर्गत सुरक्षेसाठी लढतो आहे. आयपीएस नंतर देशात अनेक चांगल्या राज्यात त्यांना सेवेची संधी होती. पण, जम्मू-काश्मीर मध्येच काम करणार या ध्येयाने श्रीधर पाटील आपल्या खाकी वर्दीत हजर झाले. आणि कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा कायम उमटवत राहिले. कोल्हापूरकरांना निश्चित भूषणावह अशी ही बाब आहे आणि श्रीधर पाटलांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
माझे कर्तव्य मी केले, पुढेही करतच राहणार आहे आम्ही पोलीस सेनादल जीवाला जीव देऊन तेथे काम करत आहोत. मी त्यातला एक घटक आहे. -श्रीधर पाटील, पोलीस अधीक्षक