प्रतिनिधी / सातारा :
राजधानी साताऱ्यातील ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहलयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, ती इमारत कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो हॉस्पिटल म्हणून उपयोगात आणली गेली. सध्या कोरोनाचा जिह्यातील कहर कमी झाला असून स्थिती पूर्ववत झाली आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत जम्बोमध्येच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतला गेला होता. मूळ मालक असलेल्या पुरातत्व विभागाला कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. जम्बो हॉस्पिटलसासाठी सध्या वापरात असलेली इमारत पुरातत्व विभागाकडे हस्तांतरण करण्यात यावी, अशी मागणी पुरातत्व विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याचे स्मरणपत्रही पाठवले आहे.









