प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदा म्हैसूर दसरा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दसरोत्सवावेळी जम्बो सवारीमध्ये सहभागी होणाऱया हत्तींचे शुक्रवारी म्हैसूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजवाडा आवारात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यंदा कोरोनामुळे जम्बो सवारी राजवाडा आवारापुरतीच मर्यादीत राहणार आहे. शिवाय केवळ पाच हत्तींचा यामध्ये समावेश करण्यात आले आहे. चामुंडेश्वरी देवीची मूर्ती आणि सुवर्णअंबारी वाहून नेण्याचा मान यंदा बलरामऐवजी अभिमन्यू या हत्तीला देण्यात आला आहे. त्याचबरोबर विक्रम, गोपी, विजय आणि कावेरी हे हत्ती देखील जम्बो सवारीमध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारपासून त्यांच्याकडून विविध प्रकारचा सराव करून घेतला जाणार आहे.
गुरुवारी दुपारी जंगलातील गजशाळेतून पाच हत्तींचे म्हैसूरच्या अरण्य भवन येथे आगमन झाले. तर शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता मंगल कलश व वाद्यवृंदांसह जयघोष करत पारंपारिक पद्धतीने हत्तींचे राजवाडा आवारामध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी माहुत व साहाय्यकांना आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच राजवडय़ातील चामुंडेश्वरी देवीची पूजा करण्यात आली. नंतर दसरा उत्सवात होणाऱया कार्यक्रमांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
याप्रसंगी म्हैसूर जिल्हा पालक मंत्री एस. टी. सोमशेखर, आमदार एस. ए. रामदास, जी. टी. देवेगौडा, एन. नागेंद्र, जिल्हाधिकारी रोहिणी सिंधुरी, महापौर तस्नीम, पालिका आयुक्त गुरुदत्त हेगडे आदी उपस्थित होते.









