अश्विन भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज
पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले. यामध्ये अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या विक्रमाचाही समावेश आहे. रविचंद्रन अश्विन आणि जडेजा या जोडीने कसोटीमध्ये 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला, असा पराक्रम करणारी भारताची दुसरी जोडी आहे. याआधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या जोडीने असा पराक्रम केला होता. त्यांचा विक्रम मोडीत निघाला.
भारत वि विंडीज दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने आपला डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला आणि विंडीजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने 2 गडी गमावत 76 धावा केल्या. या दोन्ही विकेट्स अश्विनने घेतल्या. या कामगिरीसह अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि मॅकेन्झी यांच्या विकेट घेत रविंद्र जडेजासोबत 500 विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान अश्विनने 274 आणि रवींद्र जडेजाने 266 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने एकत्र खेळताना 501 कसोटी बळी घेतले. यामध्ये अनिल कुंबळेने 281 आणि हरभजन सिंगने 220 विकेट घेतल्या.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय जोड्या-
अनिल कुंबळे (281) आणि हरभजन सिंह (220) – 54 कसोटी, 501 विकेट
अश्विन (274) आणि रविंद्र जडेजा (226) – 49 कसोटी, 500 विकेट
बिशन बेदी (184) आणि बीएस चंद्रशेखर (184) – 42 कसोटी, 368 विकेट
अश्विन ठरला भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज
विंडीजविरुद्ध कसोटीत चौथ्या दिवशी दोन फलंदाजांना बाद करत भज्जीचा विक्रम मोडीत काढला. यासह अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने हरभनज सिंगला मागे टाकण्याची कामगिरी केली. हरभनजच्या नावावर 711 आंतराष्ट्रीय विकेट्सची नोंद आहे. अश्विनच्या नावे आता 712 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद झाली आहे.
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स
- अनिल कुंबळे – 956
- रविचंद्रन अश्विन – 712
- हरभजन सिंग – 711
- कपिल देव – 687
- जहीर खान – 597
विंडीजविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज
विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यामध्ये दुसऱ्या डावात त्याने दोन बळी घेत तो वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. या यादीमध्ये कपिल देव पहिल्या स्थानावर आहेत. कपिल देव यांनी 89 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या नावे 75 तर अनिल कुंबळेच्या नावावर 74 विकेट्स आहेत.