प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधितासाठी बेडची संख्या कमी पडु लागल्याने नवीन शिवाजी संग्रहालयात जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरच्या बाहेरील परिसरात असणारी अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र पुन्हा या परिसरात सम्राट वडापाव विक्रेत्यांनी विक्री सूरू केली आहे. या विक्रेत्यांना वाहतूक पोलीसांनी सुचना देवूनही याकडे दुर्लक्ष करत मनमानी कारभार सूरू ठेवला आहे.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील किरकोळ विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी जागा दिसेल तिथे अतिक्रमण करायला सुरूवात केली आहे. असेच अतिक्रमण शिवाजी संग्रहालयाच्या एसटी स्टॅड ते पारंगे चौक या रस्त्यालगत होते. वडापाव विक्रेते, चहा च्या टपऱया, रिक्षा स्टॉप असल्याने अनेक वर्षापासून येथे अतिक्रमणाचा विळखा घट्ट होता. जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधितासाठी बेडची संख्या अपुरी पडु लागली. यामुळे नवीन शिवाजी संग्रालयात जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात आले. या सेंटर बाहेरील अतिक्रमण काढण्यात आले. सर्व विक्रेत्यांना हटवून पुन्हा येथे अतिक्रमण न करण्याचे सांगण्यात आले. तरीही गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरातील प्रसिद्ध सम्राट वडापाव विक्रेत्यांनी या सेंटरच्या बाहेर वडापाव विक्री सूरू केली आहे.
या विक्रेत्यांना वाहतूक पोलीसांनी सुचना देवूनही गाडा न हटवता विक्री सूरू आहे. या विक्रेत्यांचा मनमानी कारभार वाढला असून इतर विक्रेतेही पुन्हा थाट मांडणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे पोलीसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








