ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन जम्बो रुग्णालयातील अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम तसेच इतर सर्व आवश्यक त्या सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिले.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला.
टोपे म्हणाले, कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे, जम्बो रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या एकूण खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी तसेच कोविडसोबतच इतर आजार असलेल्या रुग्णांवरही उपचार होण्यासाठी प्रत्येक आजारातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच कोरोनासोबतच इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
कोरोना आजारामध्ये सीटी स्कॅन तपासणी महत्त्वाची असल्याचे सांगतानाच या तपासणीसाठी जम्बो रुग्णालयात मोबाइल सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच राज्यात सर्व ठिकाणीच सीटी स्कॅन सुविधा उपलब्धतेबाबत निर्देश देण्यात आले असून सीटी स्कॅनचे दरही निश्चित करण्यात येतील. कोरोना उपचार सुविधा सुलभ होण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.