वडीलांच्यावरही खूनाचाही गुन्हा दाखल, भाऊ संजय मानेला अटक
प्रतिनिधी / वडूज
म्हासुर्णे (ता. खटाव) येथील खैरओढा शिवारात 11 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास किरकोळ वादातून भावाभावामध्ये झालेल्या मारामारीत भाऊसाहेब पांडुरंग माने (वय 50) यांचा उपचारापूर्वी सातारा येथे मृत्यू झाला. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी 12 रोजी रात्री उशिरा भाऊ संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून संजय पांडुरंग माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, भाऊसाहेब पांडुरंग माने यांनी त्यांचा भाऊ संजय माने यास मी विहिरीच्या पाळीचे पैसे भरले असून ते तु का वापरतो असे संजय माने यांना म्हणाल्याचा राग येऊन संजय माने याने हातात असलेल्या काठीने भाऊसाहेब माने यांच्या डोक्यात प्रहार केला. वडील पांडुरंग देवबा माने यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत भाऊसाहेब माने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मायणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी वडूज ग्रामिण रुणालयात जाण्यास सांगितले.
मात्र रात्री खुप उशीर झाल्याने ते घरीच थांबले. त्यांना रात्रभर रत्ताच्या उलटय़ा होऊ लागल्या होत्या. शुक्रवारी 12 रोजी सकाळी 11 वाजता त्यांना वडूज ग्रामिण रुग्णालयात आणले असता त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी भाऊसाहेब माने यांना तपासले व मयत झाले असल्याचे सांगितले.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यात शुक्रवारी 12 रोजी रात्री उशिरापर्यंत संजय पांडुरंग माने व पांडुरंग देवबा माने यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून संजय पांडुरंग माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मायणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी करीत आहेत.









