क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर ओडिशा एफसीचा सामना जमशेदपूर एफसीशी होईल. सध्या जमशेदपूर एफसीचे 14 सामन्यांतून तीन विजय, सहा बरोबरी आणि पाच पराभवाने 15 गुण झाले आहेत. शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशा एफसीचे 13 सामन्यांतून एक विजय पाच बरोबरी आणि सात पराभवाने 8 गुण आहेत.
स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी ओडिशा एफसीची वाटचाल फारच खडतर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या संघापेक्षा त्यांचे 13 गुण कमी आहेत. आम्ही प्ले-ऑफच्या प्रवेशाबद्दल बोलत नाही, आम्ही आमच्या दुसऱया सामन्याबद्दल बोलत असल्याचे ओडिशाचे प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्सटर म्हणाले. आमचे प्रत्येक सामन्यात विजयाचे लक्ष्य असते आणि आरंभापासूनच आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आलो आहोत, असे बॅक्सटर म्हणाले.
ओडिशा संघाने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ एकच सामना जिंकला असून सात सामने गमविले आहेत. केवळ एकदाच क्लीन शीट राखण्यात यशस्वी ठरलेल्या ओडिशाने सरस प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध त्यांनी दोन बरोबरी साधल्या आहेत. संघाने कामगिरी उंचावण्याची गरज आहे. या घडीला आम्हाला चांगल्या कामगिरीची गरज आहे. बरोबरीत सुटलेल्या लढतींमधील कामगिरी उंचावून त्याचे विजयात रूपांतर व्हायला हवे, असे बॅक्सटर म्हणाले.
याआधी दोन संघ खेळले तेव्हा चार गोलांचा थरार होऊन बरोबरी झाली होती. आज बॅक्सटर यांना आणखी एका अवघड लढतीची अपेक्षा आहे. ओवेन कॉयल यांचा संघ नेहमी फार चुरशीने खेळतो. मी त्यांचे असे सामने पाहिले आहेत की, जेथे त्यांनी हार मानली नाही, असे बॅक्सटर म्हणाले.
जमशेदपूर एफसीची स्थिती तशीच आहे. ओडिशाला गेल्या चार सामन्यांत गुण गमवावे लागले आहेत. गेल्या चारपैकी तीन सामन्यांत जमशेदपूरला गोलच करता आलेला नाही. बाद फेरीतील स्थान दूर वाटत असले तरी प्रशिक्षक कॉयल यांना संघ गोल करण्याचा फॉर्म मिळवेल अशी आशा वाटते.
सामने जिंकण्याचा प्रयत्न करणे हाच आमच्यासमोरील मार्ग आहे. त्यामुळे एका गुणाऐवजी तीन गुणांनी पिछाडी भरून काढता येईल, असे कॉयल म्हणाले. गेल्या मोसमात माझ्या संघाने पाठोपाठ सामने जिंकले तर तुम्ही पहिल्या चार संघांत स्थान मिळवू शकता हे दाखवून दिले होते, असे कॉयल म्हणाले.









