क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल लीग फुटबॉल स्पर्धेत काल वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईन एफसीने आपल्या मोहिमेची सुरूवात विजयाने करताना जमशेदपूर एफसीला 2-1 गोलफरकाने पराभूत केले. सामन्यातील सर्व गोल पहिल्या सत्रात झाले. चेन्नईन एफसीसाठी अनिरुद्ध थापा आणि इस्माईल गोन्साल्वीसने तर पराभूत जमशेदपूर एफसीचा एकमेव गोल राफायल किव्हेल्लारोने केला. या विजयाने चेन्नईन एफसीला 3 गुण मिळाले.
गतवर्षीय उपविजेत्या चेन्नईन एफसीने सामन्याच्या पहिल्या 25व्या मिनिटातच दोन गोल करून जबरदस्त सुरूवात केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला चेन्नईन एफसीने गोल नोंदविला. अनुभवी आघाडीपटू राफायल किव्हेल्लारो आणि इस्माईल गोन्साल्वीसने संयुक्तपणे रचलेल्या चालीवर अनिरुद्ध थापाने जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टी. पी. रेहनेशला वेगळय़ा कोंडीत पकडले आणि चेंडूला जाळीची दिशा दाखविली. थापा यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात सर्वांत कमी वेळेत (52 सेकंद) आणि मोसमात गोल नोंदविणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला.
आकस्मिक गोलने भांबावलेल्या जमशेदपूर एफसीला नंतर पाचव्याच मिनिटाला गोल बाद करण्याची नामी संधीही होती. यावेळी त्यांच्या आलेक्सझांडर मोंतेरो दी लिमाचा गोलमध्ये जाणारा फटका चेन्नईनच्या एका बचावपटूला स्पर्श झाल्याने बाहेर गेला. दोनच मिनिटांनी त्यांच्या पीटर हार्टलीचा एक जबरदस्त हेडरही गोलमध्ये जाताना थोडक्यात हुकली.
त्यानंतरच्या खेळात चेन्नईनचा दरारा कायम राहिला. प्रथम 10व्या मिनिटला इस्माईल गोन्साल्वीसच्या पासवर लालियानझुआला छांगटने गोल करण्याची संधी गमविल्यानंतर 20व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहनीशने राफायल किव्हेल्लारोच्या पासवर लालियानझुआला छांगटचा फटका अडवला आणि संघावर होणारा संभाव्य गोल वाचविला.
आपली आक्रमणांची मालिका चालूच राहताना चेन्नईन एफसीला 25व्या मिनिटाला पॅनल्टी फटका मिळाला. लालियानझुआला छांगटेला ‘डी‘ कक्षेत जमशेदपूरचा बचावपटू इसाक वानमालस्वामाने धोकादायक पद्धतीने पाडल्याबद्दल रेफ्री संतोषकुमार यांनी चेन्नईन एफसीला पॅनल्टी बहाल केली. याचा अचुक उपयोग करताना इस्माईल गोन्साल्वीशने रेहनीशला भेदले व संघाची आघाडी दोन गोलांनी वाढविली.
दोन गोलांच्या पिछाडीनंतर जमशेदपूर एफसीने चांगला आणि नियंत्रित खेळ केला आणि 37व्या मिनिटाला बरोबरीही साधली. एफसी गोवाचा माजी खेळाडू जॅकीचंद सिंगने दिलेल्या एका जबरदस्त क्रॉसवर नेरीजूस वाल्सकीसने अचुक हेडरवर गोलरक्षक विशाल कैथला भेदले आणि संघाची पिछाडी एक गोलने कमी केली.
दुसऱया सत्रात जमशेदपूर एफसीने आरंभालाच एक बदल करताना मध्यफळीतील जितेंद्र सिंगला वगळले आणि आघाडीफळीत आक्रमकता आणण्यासाठी जॉन फित्झेराल्ड याला संधी दिली. दोन्ही संघांचे समान वर्चस्व कालच्या लढतीवर आढळून आले. प्रथम 55व्या मिनिटाला लालियानझुआलाच्या पासवर जॅकूब सिल्वेस्टरचा फटका जमशेदपूर संघाच्या गोलबार वरून केला. लगेच जमशेदपूरच्या स्टीफन इझेने हेडरवर गोल करण्याची संधी गमविली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी चेन्नईनला आपली आघाडी दोन गोलांनी वाढविण्याची संधीही होती. यावेळी रहीम अलीने दिलेल्या पासवर लालियानझुआला छांगटेचा ग्राऊंडर रेहनीशने चपळाईतेने अडविला.









