वार्ताहर / जमखंडी :
अन्नभाग्य तांदळाची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना 2940 किलो तांदूळ जप्त करून तिघांना अटक करण्यात आली. सदर कारवाई कुंचनूर सर्कलजवळ रात्री जमखंडी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी व पोलिसांनी केली. सनीफ अब्बासअली पत्ते, जावेद तांबोळी, दस्तगीरचांद मुधोळे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 2.44 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, येथील कुंचनूर सर्कलजवळ रात्री तिघेजण गुड्स वाहनातून अन्नभाग्य तांदळाची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांसह नियोजनबद्ध सापळा रचून वाहन अडवले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता 15 किलोप्रमाणे 69 अन्नभाग्य तांदळाची पोती आढळून आली. त्यानंतर सदर तांदळाची पोती, गुड्स वाहन जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक संगापूर, मल्लू कोलार, बी. एम. जंबगी, बिरादार, आहार शिरस्तेदार डी. बी. देशपांडे, निंगाप्पा देसाई यांनी केली.









