स्क्रीन टाईम याचा अर्थ मूल चोवीस तासात किती वेळासाठी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेट आधी वस्तूंचा वापर करतो, ते पाहातो तो काळ. हल्ली मुलांचा बराचसा वेळ मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, टॅब यांच्या वापरात जातो. परंतु हे डोळ्यांसाठी हानीकारक आहे.
- पाच वर्षाच्या मुलांमध्ये डोळ्यांचा विकास होतो. याच काळात मुले अधिक काळ मोबाईल पाहात असतील तर त्यांच्या डोळ्यावर याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. मुलांची दृष्टी कमजोर होते, कमी वयात चष्मा लागू शकतो. डोळ्यांचे विकारही होतात.
- वस्तुतः, अगदी लहान मुलांनी मोबाईल स्क्रीन पाहूच नये. अमेरिकन ऍकाडमी ऑफ पिडीयाट्रिक्स नुसार 18 महिन्यापर्यंतच्या बाळाला स्क्रीनपासून दूर ठेवावे. दोन वर्षापर्यंतच्या बाळाला थोडा वेळ स्क्रीन टाईम चालू शकतो. 2 ते 5 वर्षाच्या मुलाला एक तासापेक्षा जास्त वेळ स्क्रीन बघायला देऊ नये. त्यापेक्षा मोठी मुले 3-4 तास मोबाईल पाहू शकतात. अर्थात सलगपणे नाहीच, दर अर्धा तासाने पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घेतलाच पाहिजे.
- मुले ज्या खोलीत अभ्यास करतात तिथे योग्य प्रमाणात उजेड असला पाहिजे. अंधार्या, कमी उजेडाच्या खोलीत स्क्रीनकडे पाहाणे ह्यामुळे डोळ्यांवर जास्त दबाव पडतो. मोबाईल- कॉम्प्युटर यावर अभ्यास करणार्या मुलांनी अँटीग्लेअर चष्मा लावणे गरजेचे आहे. हेडफोन्स चा वापर न करता स्पीकर मोडवर फोन ठेवून अभ्यास करावा.
- स्क्रीनकडे पाहून अर्थात कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप यावर काम करताना डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून 20 मिनिटांनी ब्रेक घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना तर दर दहा- पंधरा मिनिटांनी ब्रेक घेणे आवश्यक आहे. स्क्रीनकडे पाहातानाही पापण्या हलवल्या पाहिजेत. कोणतीही गोष्ट लांबून पहावी. त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
- मुलांना कॉम्प्युटर किंवा मोबाईल पहायला देताना, अभ्यासाला देताना मुले काय करताहेत त्याकडे लक्ष द्या. अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल आणि लॅपटॉप वापरासाठी काही नियम ठरवावेत. त्याव्यतिरिक्त काय पाहिले जाते त्यावर लक्ष ठेवणारी ऍप्सही येतात.
- सध्याच्या काळात तंत्रज्ञानापासून पूर्ण ‘विलगीकरण’ शक्य नाही. म्हणूनच मुलांना शारिरीक व्यायाम करण्यासही उद्युक्त करावे. सायकलिंग करणे, धावणे, पळणे आदी गोष्टी करण्यास सांगावे. त्यामुळे तंदुरस्त राहाण्यास मदत होईल.