किडनी अर्थात मूत्रपिंड हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड अनेक क्रिया करत असते त्यामुळे शरीराचे आरोग्य त्यावर अवलंबून असते, असे म्हणता येईल.
- रक्त शुद्ध करणे, हार्मोन्स निर्माण करणे, खनिजे शोषून घेणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे आणि आम्लाचे संतुलन राखणे आदी कार्य मूत्रपिंड करत असते.
- मूत्रपिंड रोगग्रस्त झाले तर शरीराची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडू शकते, त्यावर प्रभाव पडू शकतो. लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि हाडांसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्वाचे चयापचय सर्वच बिघडते.
- दरवर्षी मूत्रपिंडाच्या विकारामुळे लाखो
लोकांना जीव गमवावे लागतात. वास्तविक, योग्य वेळी योग्य उपचार
झाल्यास रूग्णाचे प्राण वाचवता येतात.
मूत्रपिंडाच्या रोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्च महिन्यातील दुसरा गुरूवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून पाळला जातो. - मूत्रपिंडाच्या विकारांच्या
कारणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धमनीकाठिण्य यांचा समावेश असतो. या तीनही आजारांमध्ये मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. - वेदनाशामक गोळ्या किंवा प्रतिजैविके यांचेही दीर्घकाळ सेवन केल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होते.
- मूतखडा किंवा प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळेही गुंतागुंत वाढू शकते.
निरोगी किडनीसाठी….
- रोज किमान दीड ते दोन लीटर पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील सोडियम, युरिया आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
- मूत्रपिंड खराब झाले किंवा मूत्रपिंडाला सूज आली असेल तर पातळ पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
- रोजचा आहार पोषक आणि आरोग्यदायी असावा. मूत्रपिंड अशक्त झाले असल्यास आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी असावे. पनीर, डाळी, शेंगवर्गीय भाज्या, सोयाबिन आदी पदार्थ सेवन करू नयेत. मीठाचे प्रमाणही कमी असावे.
- धूम्रपान आणि मद्यपान यांच्यापासून दूर रहावे. कारण धूम्रपान केल्याने मूत्रपिंडातील रक्ताचा प्रवाह मंदावतो. अतिमद्यपान केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडावर अधिक ताण येतो.
- उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगांना आमंत्रण मिळतेच परंतु त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात असावा.
- शरीर तंदुरूस्त ठेवण्याकडे लक्ष्य द्यावे. जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत. रोज 30 मिनिटे व्यायाम आठवडय़ातून किमान पाच दिवस अवश्य करावा.
- वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही वेदनाशामक गोळ्या आणि प्रतिजैविकांचे सेवन करू नये.
मूत्रपिंड खराब झाल्यास
- हात आणि पाय यांना सूज येऊ शकते. रक्तदाबात वाढ होणे, हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा, मळमळ, उलटी येणे आदी प्राथमिक लक्षणे आहेत. ही लक्षणे अत्यंत धीम्या गतीने वृद्धींगत होत राहातात. त्यामुळे रूग्णाला त्याविषयी काही समजत नाही. परिणामी योग्य वेळी उपचारही मिळत नाहीत.
- अनेकदा मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रूग्णांच्या लघवीमधून प्रथिने आणि लाल रक्तपेशी जाऊ लागतात. त्याचबरोबर रक्तदाबही वाढतो. चेहरा आणि पाय यांना सूज येते. त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात. सांधेदुखीचीही तक्रार जाणवू शकतो.
- काही लक्षणे
- रक्तदाबात वाढणे, डोळे, हात, पाय यांना सूज.
- लघवीमधून रक्त जाणे, लघवीचा रंग बदलतो, लघवीमध्ये जास्त फेस येणे, कमी किंवा सतत लघवी होणे.
- भूक कमी झाल्यामुळे खूप थकवा येणे.
- श्वासाला दुर्गंधी येणे आणि तोंडाची चव जाणे.
- मूत्रपिंडाची तपासणी करण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. मूत्रपिंड पूर्ण खराब झालेले असले तरीही डायलिसिस आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या मदतीने रूग्णाला सामान्य आयुष्य जगणे शक्य होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी उपयुक्त दात्याकडून मूत्रपिंड घेऊन रूग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जाते.
– डॉ. संजय गायकवाड









