अनेक ठिकाणी बुलेट ट्रेन रद्द : 500 देशांतर्गत उड्डाणे स्थगित
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये एक आठवडय़ात दुसऱया चक्रीवादळाने धडक दिली आहे. या चक्रीवादळामुळे वीजपुरवठय़ावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. देशातील सुमारे 5 लाख लोकांच्या घरातील वीज गेली आहे. ओकिनावा समवेत अनेक बेटांवर चक्रीवादळाने घरांचे नुकसान केले आहे. सुमारे 8 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात ओल आहे.
सोमवारी चक्रीवादळ पुढे निघून गेल्यावरही अनेक भागांमधील वाहतूक सेवा पूर्ववत होऊ शकलेली नाही. अनेक ठिकाणी बुलेट ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 10 विमानतळांवरील सुमारे 500 विमानोड्डाणे स्थगित ठेवण्यात आली आहेत. हवामान विभागानुसार मागील 24 तासांत हॅशेन चक्रीवादळ कमजोर झाले आहे, परंतु चक्रीवादळ पुढे निघून गेल्यावरही मुसळधार पाऊस पडू शकतो. 144 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे चक्रीवादळ दक्षिण कोरियाच्या दिशेने सरकले आहे.
क्युशु प्रांतात 40 जखमी
जपानच्या क्युशु प्रांतात सुमारे 40 जण जखमी झाले आहेत. मियाजाकी प्रांतात सोमवारी झालेल्या भूस्खलनात 4 जण बेपत्ता झाले असून एक जखमी झाला आहे. तेथील सुमारे 4 लाखांहून अधिक घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. पुरात सुमारे 43 जणांना जीव गमवावा लागला होता.
मयस्क चक्रीवादळ
जपानमध्ये 7 दिवसांमध्ये धडकलेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी तेथे मयस्क चक्रीवादळ धडकले होते. यादरम्यान जपानच्या किनाऱयानजीक 5800 गायींची वाहतूक करणारे जहाज बुडाले होते. या जहाजावरील 43 कर्मचाऱयांपैकी केवळ 2 जणांना वाचविणे शक्य झाले होते.









