वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या पक्षाच्या आघाडीने रविवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत राखले आहे. किशिदा यांची लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) आणि आघाडीतील सहकारी कोमितोने 465 सदस्यीय प्रतिनिधिगृहात 274 जागा जिंकल्या आहेत. तर 40 जागांवर निकाल अद्याप लागलेला नाही.
या मोठय़ा निवडणूक विजयाचा पूर्ण वापर देशाच्या उभारणीत करू. कोरोना महामारीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अतिरिक्त तरतूद संमत करवून घेणे देखील यात सामील असल्याचे किशिदा यांनी विजयानंतर बोलताना म्हटले आहे.
एलडीपीने 247 जागा जिंकत स्वबळावरच बहुमत मिळविले आहे. तर कोमितोला 27 जागा मिळल्या आहेत. बहुमताचा आकडा 233 इतका होता. आघाडीने 261 चा आकडा ओलांडल्याने संसदीय समितीवर नियंत्रण आणि कायदे संमत करवून घेणे सरकारला शक्य होणार आहे.
सत्तारुढ पक्षात नेतृत्वाची शर्यत जिंकल्यावर 4 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान म्हणून निवडले गेलेले किशिदा यांनी 10 दिवसांतच प्रतिनिधिगृह विसर्जित केले होते. तर मध्यावधी निवडणुकीतील प्रचार प्रामुख्याने कोरोना संकटातील उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेला रुळावर परत आणण्याच्या पावलांवरच केंद्रीत राहिला.
किशिदा यांनी पूर्वीपेक्षा अधिक प्रखरपणे चीनचा सामना करण्यासाठी सैन्य खर्च वाढविण्यावर भर दिला आहे. तसेच ते जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आर्थिक पैलूंना हाताळण्याच्या उद्देशाने एक नवे कॅबिनेट पद निर्माण करणार असून तेथे 46 वर्षीय ताकायुकी कोबायाशी यांची नियुक्ती होणार आहे. जपान आणि अमेरिकेमधील दृढ सहकार्य आणि आशिया तसेच युरोपमधील समान विचारसरणी असणाऱया अन्य देशांसोबत भागीदारीचे किशिदा समर्थन करतात.
किशिदा यांच्यावर पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा दबाव आहे. सुगा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला होता. कोराना महामारीवेळी लागू उपाययोजना आणि टोकियोमध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यावर ठाम राहिल्याप्रकरणी सुगाम यांच्याबद्दल जनतेत आक्रोश निर्माण झाला होता.









