पंतप्रधान शिंजो आबे यांची घोषणा : जगभरात 55,20,738 कोरोनाबाधित : 3 लाख 47 हजार 15 बळी
जगभरात 55 लाख 20 हजार 738 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 23 लाख 13 हजार 271 बाधितांनी संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 3 लाख 47 हजार 015 जणांचा बळी गेला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील आणीबाणी हटविली आहे. साथरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतर सरकारने होक्काइदो, टोकियो, साइतामा, छिबा आणि कनागावा प्रांतांमधील आणीबाणी हटविली आहे. मागील गुरुवारी ओसाका, क्योटो आणि ह्योगो प्रांतांमधून आणीबाणी हटविण्यात आली होती. तर 14 मे रोजी 39 प्रांतांमधील निर्बंध मागे घेण्यात आले होते. जपानमध्ये 16 हजार 550 रुग्ण सापडले असून 820 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलचे अध्यक्ष टीकेचे धनी

ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांची एक चित्रफित प्रसारित होत असून यात लोक त्यांना खुनी आणि निरर्थक व्यक्ती संबोधित आहेत. बोल्सोनारो रविवारी ब्राझिलियामध्ये हॉटेलिंगसाठी बाहेर पडले असताना महामारीला तोंड देण्यासंबंधीच्या धोरणांवरून संतप्त जमावाने त्यांच्यासाठी अभद्र शब्दांचा वापर केला आहे. ब्राझील हा जगातील दुसऱया क्रमांकाचा कोरोना पीडित देश आहे.
भारतीय उद्योजकाचा पुढाकार

जगभरात ईद साजरा केला जात असताना सिंगापूरमधील भारतीय उद्योजक दुष्यंत कुमार आणि त्यांच्या पत्नीने रविवारी रात्री 600 मजुरांना बिर्याणीचे वाटप केले आहे. सिंगापूरमध्ये सुमारे 3 लाख मजुरांचे वास्तव्य आहे. यातील बहुतांश जण भारत, बांगलादेश आणि चीनमधील नागरिक आहेत. या स्थलांतरित मजुरांमध्येच कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात दिसून येतोय.
अमेरिकेत 638 बळी

अमेरिकेत एका दिवसात 638 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील मृतांचा एकूण आकडा आता 99 हजार 300 झाला आहे. तर तेथील बाधितांचे प्रमाण 16,86,436 वर पोहोचले आहे. न्यूयॉर्कमध्ये रुग्णांची संख्या 3 लाख 71 हजार 193 झाली आहे. अमेरिका ब्राझीलला 1 हजार व्हेंटिलेटर्स दान करणार आहे.
न्यूझीलंडः रुग्ण नाही

न्यूझीलंडमध्ये सोमवारी एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. देशात आतापर्यंत 1,504 बाधित सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेला पाठविण्यात आलेल्या अहवालानुसार देशात कोरोना संसर्ग आता मंदावला आहे. 6 मेपासून देशात संसर्गामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
प्रसिद्ध सोन्याची खाण बंद

दक्षिण आफ्रिकेच्या पेनेन्ग सोन्याच्या खाणीत 164 कोरोनाबाधित सापडल्यावर ती बंद करण्यात आली आहे. ही जगातील सर्वात खोलीची सोन्याची खाण आहे. याची खोली सुमारे 4 किलोमीटर असून यात हजारो कर्मचारी काम करतात. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे संकट काही प्रमाणात स्थिरावल्याने सरकारने 1 जूनपासून टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
चिली : 69 हजार बाधित

चिलीमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण सातत्याने वाढू लागले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवरील दबाव देखील वाढला आहे. देशात आतापर्यंत 69,102 रुग्ण सापडले असून 718 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे राजधानी सँटियागोमध्ये अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
1 जूनपासून शाळा सुरू

ब्रिटनमध्ये 1 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. तर काही शाळा 15 जूनपासून सुरू होतील. वर्गामधील विद्यार्थ्यांचे प्रमाण निर्धारित केले जाणार आहे. शाळेत सॅनिटायजेशनची व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेबाहेरील क्रिया वाढविण्यात याव्यात. कर्मचारी किंवा विद्यार्थ्याच्या प्रकृतीबद्धल संशय वाटल्यास त्वरित त्याची चाचणी केली जाईल.
पहिली लस अमेरिकेतच!

कोरोनावरील लस सर्वप्रथम अमेरिकाच तयार करणार असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी केला आहे. उपचारपद्धत आणि लस निर्माण करण्यासाठी आम्ही जोरदार काम करत आहोत. लस निर्माण केल्यावर केवळ अमेरिकाच नव्हे तर पूर्ण जगाला ती उपलब्ध केली जाणार आहे. परंतु चीन स्वतःसाठी लस चोरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ब्रायन यांनी म्हटले आहे.









