चीनच्या वुहान शहरातून फैलावलेला कोरोना विषाणू सातत्याने स्वतःचे नवनवे रुप धारण करत आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेनंतर आता जपानमध्येही कोरोनाचा एक नवा संकरावतार आढळून आला आहे. कोरोना विषाणूचे हे नवे स्वरुप ब्रिटनमध्ये मिळालेल्या विषाणूप्रमाणेच अत्यंत अधिक फैलाव करणारा असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणूचे हे नवे स्वरुप आतापर्यंत दिसून आले नव्हते. ब्राझीलमधून परतलेल्या 4 जणांमध्ये विषाणूचे हे स्वरुप सापडले आहेत.
हे बाधित प्रवासी 2 जानेवारी रोजी ब्राझील येथून जपानच्या हनेदा विमानतळावर उतरले होते. या सर्वांची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती आणि आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सुमारे 40 वर्षीय व्यक्तीत जपानमध्ये परतल्यावर कुठलेच लक्षण दिसून आले नव्हते, परंतु नंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पीडित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत आहे. या सर्वांची चाचणी करण्यात आली असता एका नव्या स्ट्रेनचा शोध लागला आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला या नव्या संकरावताराची माहिती दिली आहे.
जपानमध्ये मिळालेला कोरोनाचा नवा संकरावतार अद्याप विकसित होत असल्याने तो किती फैलाव करणारा आहे, याचा शोध लागलेला नाही.
पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
जपानने महामारीला रोखण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान लोकांना मास्कचा वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे अनिवार्य पालन करावे लागणार आहे. आरोग्य अधिकारी आणि पोलीस लोकांची तपासणी करणार आहेत. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी रेस्टॉरंटमध्ये कामकाजाच्या वेळेत कपात करणे आणि लोकांना घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. लोकांच्या सहकार्याद्वारे आम्ही या संकटातून बाहेर पडू, असे सुगा म्हणाले.









