प्रत्येक गल्ली-चौकात दिसतील माणसांरखी बाहुली
जपान हा जगात तंत्रज्ञानाप्रकरणी सर्वात पुढारलेला देश मानला जातो. साधनसंपत्तीच्या दृष्टीकोनातून अत्यंत प्रगत असलेल्या जपानमधील गावे आता ओस पडू लागली आहेत. देशात वृद्धांची संख्या अधिक झाल्याने गावांमधील कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होतेय. अशा स्थितीत एका गावात राहणाऱया लोकांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी अनोखे पुतळे तयार करण्यात आले आहेत. या गावात माणसं कमी आणि पुतळे अधिक दिसून येतात.
नगोरो नावाच्या गावातील लोकसंख्या आता फारच कमी झाली आहेत. गावात एकेकाळी 300 लोक राहत होते. पण आता तेथे माणसांपेक्षा अधिक बाहुल्या दिसून येतात. गावातील प्रत्येक गल्ली-चौकात दिसून येणाऱया माणसांसारख्या बाहुल्या तेथील लोकांचा एकाकीपणा दूर करण्यास मदत करतात. या बाहुल्या सुकिमा आयो नावाच्या महिलेने तयार केल्या आहेत. त्या स्वतः देखील नगोरो गावातच राहतात.

त्यांनी प्रारंभी केवळ गम्मत म्हणून स्वतःच्या वडिलांचे कपडे घातलेला एक स्केयरक्रो तयार केला होता. पण त्यांनी या छंदाला मोहिमेचे स्वरुप दिले आणि आता गावात माणसांपेक्षा बाहुल्यांचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक भाषेत या बाहुल्यांना बिजूका म्हटले जाते. लोकांच्या घरात, अंगणामध्ये, रस्त्यांवर आणि शेतांमध्ये बिजूका उभे आहेत. काही लोक तर त्यांना माणूस समजून त्यांच्याशी वागू लागले आहेत.
गावात पूर्वी एक शाळा होती, पण मुलांच्या कमी संख्येमुळे ती बंद पडली. आता तेथे मुलांऐवजी पुतळे बसविण्यात आले आहेत. शिक्षकासारखी एक बाहुलीही बसविण्यात आली आहे. बाहुल्यांचे गाव करण्यासाठी सुकिमा यांना अनेक वर्षे लागली. सुकिमा बिजूका तयार करण्यासाठी लाकूड, वृत्तपत्र आणि कापडांचा वापर करतात. बिजूकांना माणसांचे कपडे घातले जातात आणि प्रॉपर टचअप देण्यात येतो.









