टोकियो –
जपानने अंदाजे 16 लाख मॉडर्ना लसीचे लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. सदरच्या मॉडर्ना लसी या दुषीत असल्याच्या कारणास्तव सरकारने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱया आरोग्य मंत्रालयाला लसीकरणाचे विदेशी साहित्य हाती लागले होते, ज्यात 5 लाख 60 हजार बाटल्या होत्या. टकेडा फार्मास्युटिकल्सकडून सदरच्या लसींची विक्री व वितरण जपानमध्ये करण्यात येते. सदरच्या मॉडर्ना लसीत भेसळ झाल्याचा संशय सरकारला आला असून याची उच्चस्तरीय चौकशी केली जात असल्याचे समजते. 7 लसीकरण केंद्रांवर तपासणी केली असता तेथे 39 लसीच्या बाटल्या दुषीत स्वरूपात असल्याचे दिसून आले आहे. जपानमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढले असून सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यात पुन्हा टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू असल्याने कोरोना रुग्ण संख्या वाढीची भीतीही सरकारला सतावते आहे. फायझर व ऍस्ट्राझेनेका लसीला मंजुरी मिळाली असून मेमध्ये मॉडर्नाला मंजुरी मिळाली होती.









