टोकीयो
जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा हे लवकरच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडन यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे संकेत आहेत. अंदाजे सुगा हे ज्यो बायडन यांची भेट घेण्यासाठी 16 एप्रिल रोजी वॉशिंग्टन दौऱयावर जाणार असल्याची माहिती सरकारने शुक्रवारी दिली आहे. याअगोदर त्यांचा दौरा होणार असल्याची घोषणा केली होती, परंतु अधिकृत तारीख घोषित केली नव्हती. मुख्य कॅबिनेट सचिव कट्सुनोबु काटो यांनी माहिती देताना म्हटले आहे, की सुगा हे पहिले असे विदेशी नेते आहेत की जे जानेवारीत पदग्रहण केल्यानंतर लगेच बायडन यांच्या भेटीला जात आहेत. सदरचा दौरा हा अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांसाठी महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच जपान व अमेरिका यांच्या मैत्रीची ताकद आणि हिंदी-प्रशांत क्षेत्रातील मुद्दे आदींवर सविस्तर चर्चा घडवून आणली जाणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त केला जात असून जपान अमेरिकेतील नवीन प्रशासनासोबत मैत्रीचे संबंध निर्माण करण्यासाठी जपान उत्सुक असल्याचे कॅबिनेटने स्पष्ट केले आहे.









