टोकियो / वृत्तसंस्था
मागील काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत असलेले जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आजारपणामुळे आपल्यावरील जबाबदारी पार पाडणे शक्मय नसल्याची स्पष्टोक्ती देत त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी ऍबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दीर्घ आजाराने त्रस्त असलेले शिंजो ऍबे पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना भावूक झाले. पंतप्रधानपदी कार्यरत असताना मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला वेदना होत आहेत,’’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मागील बऱयाच काळापासून ऍबे यांना अल्सरचा त्रास होत आहे. तसेच त्यांच्या आतडय़ाला सूज आली आहे. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी पदत्यागाचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या जागेवर कोण विराजमान होणार याकडे भारताचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान अर्थमंत्री तारो असो, माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्र मंत्रीपदी काम केलेले फुमिओ किशिदा, संरक्षणमंत्री तारो कोनो यांची नावे सध्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत.









