घरफाळा भरण्याची सक्ती मागे : पक्ष, संघटना, नागरिकांच्या विरोधामुळे महापालिका प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना कोल्हापूर महापालिकेकडे शहरातील मिळकतींचा केवळ पन्नास टक्के घरफाळा जमा झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेने आता उत्पन्नवाढीसाठी वसुली मोहीम तीव्र केली आहे. घरफाळा भरल्याशिवाय महापालिकेतून दिल्या जाणाऱया कोणत्याही परवानगी (मंजुरी) अथवा जन्म, मृत्युच्या दाखल्यासह इतर दाखले संबंधित मिळकतधारकांना मिळणार नाहीत. अशा प्रकारचा नवा नियम महापालिकेच्या प्रशासनाने केला असून नागरी सुविधा केंद्रासह संबंधित विभागांना या संदर्भातील पत्रही पाठविण्यात आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्राेतांपैकी घरफाळ्याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न मोठे आहे. 2020-2021 या आर्थिक वर्षात घरफाळा विभागाला 78 कोटींचे उद्दीष्ट असताना प्रत्यक्षात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ 40 कोटी घरफाळा वसूल झाला होता. पन्नास टक्केही घरफाळा वसुली न झाल्याने महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे 38 कोटींचा थकीत घरफाळा वसुल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी महापालिकेला असणाऱया प्रशासकीय आणि कार्यालयीन अधिकारानुसार घरफाळा वसुली करण्यासाठी नवी शक्कल लढविताना घरफाळा भरल्याशिवाय कोणताही दाखला अथवा परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर घरफाळा वेगाने वसूलही होऊ लागला. पण काही अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि माजी नगरसेवक यांनी विरोध सुरू केला. घरफाळा वसुलीसाठी नोटिसा पाठवा पण घरफाळा भरल्याशिवाय दाखले न देण्याची पद्धत मात्र बंद करा, अशी मागणी झाली. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी सोमवारी जन्म, मृत्युच्या दाखल्यासह इतर दाखले, परवानगी देताना घरफाळा भरल्याचे पत्र दाखविण्याची सक्ती मागे घेण्याचे पत्र नागरी सुविधा केंद्रांना पाठविले.
दाखला मिळणार पण घरफाळा होणार चेक
महापालिकेने घरफाळा भरण्याची सक्ती मागे घेऊन दाखले देण्याचा निर्णय घेतला असला तरी दाखला देताना संबंधित मिळकतधारकाने घरफाळा भरला आहे की नाही याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना घरफाळा भरण्याविषयी नोटीस पाठविली जाणार आहे.