प्रतिनिधी/ बेळगाव
जन्म-मृत्यु दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आल्याने नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या फेऱया मांराव्या लागत आहेत. जन्म-मृत्यु दाखला वितरणाच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी अपयशी ठरले आहेत. दररोज नवे नियम लागू करण्यात येत असल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जन्म व मृत्यु दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. अर्ज केल्यानंतर सात दिवसानी दाखला घेण्याची सुचना नागरिकांना करण्यात येत आहे. तरीदेखील दाखला वेळेत मिळत नसल्याने जन्म-मृत्यु दाखला काऊंटरवर गर्दी होवून वादावादीचे प्रकार घडत आहेत. जन्म-मृत्यु दाखला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने अर्ज घेण्यासाठी वेगळे काऊंटर आणि दाखले वितरणासाठी वेगळे कॉऊटर करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी दोन कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करूनही नागरिकांना दाखला मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. दाखला मिळविण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
जन्म-मृत्यु दाखल्यासाठी अर्ज दुपारी दिड वाजेपर्यत स्विकारण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत आणखीन भर पडली आहे. दाखले घेण्यासाठी चंदगड तालुका, खानापुर तालुका तसेच गोकाक, संकेश्वर, गोवा, आजरा, गडहिग्लज अशा विविध परगावाहून नागरिक येत असतात. पण दुपारनंतर अर्ज स्विकारण्याचे बंद करण्यात येत असल्याने परगावाहून आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागत आहे. दाखले देण्याकरीता आणि अर्ज स्विकारण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आल्याने अर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.









