केंद्रीयमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांची माहिती : वर्षाकाठी 500 कोटी रुपयांची बचत
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 2020-21 या आर्थिक वर्षात 125 कोटी रुपयांची जेनेरिक औषधे विक्री करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. राज्यभरात जनौषधी केंद्रांमुळे जनतेची 500 कोटी रुपयांची बचत होत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी दिली आहे.
मागील सहा महिन्यात राज्यात जनौषधी केंद्रांमध्ये 65 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली आहे. कोरोनासारख्या संकटकाळात देखील जेनेरिक औधष विक्री केंद्रांनी ठरविक उद्दिष्ट बाळगून व्यवहार केला आहे. राज्यात पीएमबिजेपी योजनेंतर्गत सुरू झालेली जनौषधी केंद्रांच्या कामकाज आणि व्यवहारासंदर्भात प्रगती आढावा बैठक घेतल्यानंतर मंत्री सदानंदगौडा यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. खासगी मेडिकलमध्ये मिळणाऱया ब्रॅन्डेड औषधांच्या तुलनेत जनौषधी केंद्रांमध्ये मिळणारी तीच औषधे चार ते पाचपट कमी किमतीत मिळतात. वर्षाकाठी जनौषधी केंद्रांद्वारे 125 कोटी रुपयांची उलाढाल होते. जनौषधी केंद्रे नसती तर जनतेला खासगी मेडिकलवरच अवलंबून रहावे लागले असते, असे सदानंदगौडा यांनी सांगितले आहे.
इतक्या किमतीची औषधे खासगी मेडिकलमध्ये खरेदी करायची झाल्यास 600 ते 700 कोटी रुपये खर्च झाले असते. राज्यातील जनतेची जनौषधी केंद्रांद्वारे यंदा 500 कोटी रुपयांची बचत होत आहे. येथील औषधे स्वस्त असल्याने त्यांचा दर्जा निकृष्ट नाही. सर्वसामान्यांना परवडणाऱया किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनौषधी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेमुळे राज्यातील जनतेला वर्षाकाठी 500 कोटी रुपयांची बचत होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जनौषधी केंद्रांमध्ये औषध विक्रीत 73 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती सदानंदगौडा यांनी दिली आहे.