शेतकऱयांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे : प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक : वेंगुर्ले सभापतींनी केले आवाहन
के. जी. गावडे / वेंगुर्ले:
गुजरात राज्याच्या बोताड व कच्छ जिल्हय़ामध्ये ‘क्रिमियम कांगो हिमोरेजिक फिवर’ चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. सदर आजार हा झुनॉटिक स्वरुपाचा जनावरांपासून मानवास होणारा रोग आहे. महाराष्ट्र राज्य गुजरात राज्याच्या लगत असल्याने व आपल्या भागात गुजरात राज्यातून मोठय़ा प्रमाणात गीर गाई जाफ्राबादी म्हशी तसेच शेळय़ा, मेंढय़ा यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असल्याने येथे हा रोग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही करावी, असे आवाहन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी व वेंगुर्ले पशुधन विकास अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देताना डॉ. देसाई म्हणाले, मानवात तसेच प्राण्यांमध्ये जिवाणू, विषाणू प्राटोझोअल तसेच बाहय़कृमी गोचिड, पिसवा तसेच अंतकृमीच्या बाधेने विविध प्रकारचे सांसर्गिक तसेच असांसर्गिक रोग उद्भवतात. यामध्ये काही रोगांची बाधा ही प्राण्यांपासून मानवास होत असते. अशा रोगांना झुनॉटिक आजार म्हणतात.
गुजरात राज्यात हिमोरेजिक फिवरचा प्रादुर्भाव
गुजरात राज्याच्या बोताड व कच्छ जिल्हय़ामध्ये क्रिमियम कांगो हिमोरेजिक फिवरचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. सदर आजार हा झुनॉटिक स्वरुपाचा जनावरांपासून मानवास होणारा रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव यापूर्वी कांगो, दक्षिण आफ्रिका चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. सदरील रोग नैरो व्हायरस या विषाणूमुळे होत असून हे विषाणू मुख्यत्वेकरून हायलोमा या जातीच्या गोचिडीद्वारे एका जनावरापासून दुसऱया जनावरास व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमित होतात. या रोगामुळे पाळीव जनावरांमध्ये (उदा. गायी, म्हशी, शेळय़ा, मेंढय़ा) सहसा रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि रोगबाधित जनावरे, पक्षी या विषाणूचे वाहक म्हणून कार्यरत राहातात.
अशा वाहक जनावरांच्या संपर्कामध्ये आलेल्या जनावरांचे मालक, जनावरांच्या संपर्कातील व्यक्ती, पशुवैद्यक व कर्मचारी यांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बाधित जनावरांचे मांस खाल्ल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व कीटकाच्या दंशामुळे मानवास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. माणसांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित व्यक्तीपैकी 30 टक्क्यापर्यंत व्यक्ती निदान व उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्यता असते. या रोगाने बाधित झालेल्या व्यक्तीमध्ये सुरुवातीस डोकेदुखी, अंगदुखी, उलटी, डोळे लाल होणे वगैरे लक्षणे दिसून येतात.
महाराष्ट्रात रोगाचा अधिक धोका
महाराष्ट्र राज्य गुजरात राज्याच्या लगत असल्याने रोगाचा प्रादुर्भाव येथे होण्याची शक्यता आहे. या विषाणूजन्य रोगाविरुद्ध प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाहय़ कीटकांचे उच्चाटन करणे ही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. गोठय़ातील गोचिडीचे निर्मूलन गोचिडनाशक औषधाची फवारणी करून करणे आवश्यक आहे. गोचिड बाधित जनावरांवरील गोचिडी शक्यतो हाताने काढणे टाळावे.
उपाययोजना
जनावरांच्या अंगावरील व गोठय़ातील गोचिड निर्मूलन, नियंत्रण ही महत्वाची उपाययोजना आहे. त्यासाठी मेटारिझिम या बुरशीचा वापर करावा. यामुळे गोचिड मरत नाही. पण गोचिडीतील अंडय़ांचा जीवनक्रम मोडू शकतो. तसेच पंधरा दिवसांनी तीनवेळा असे प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे चार महिन्यानी मेटारिझमची फवारणी करावी. कच्च्या मांसाचे सेवन न करता मांस चांगल्याप्रकारे शिजवून खावे. जनावरांच्या बाजारातील आवकजावक थांबवावी. बाहेरून आणलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांचे शक्यतो कळपापासून अलगीकरण करून गोचिड प्रतिबंधात्मक उपचार करावेत. कत्तलखाना, खाटिक व्यावसायिक व्यक्तींनी प्राण्याचे रक्त, मांस अथवा द्रवाशी थेट संपर्क येणार नाही, याची योग्य ती काळजी घ्यावी. गुजरात राज्यातून मोठय़ा प्रमाणात आपल्या भागात गीर गाई, जाफ्राबादी म्हशी तसेच शेळय़ा, मेंढय़ा यांची खरेदी केली जाते. क्रिमीयम कांगो हिमोरेजिक फिवर आटोक्यात येईपर्यंत ती थांबविण्यात यावी. जनावरांच्या संपर्कातील व्यक्तींनी वैयक्तिक काळजी घ्यावी. अशा व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्याची माहिती तात्काळ नजीकच्या आरोग्य व पशुसंवर्धन विभागास द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.