पशुपालकांमध्ये खळबळ : रोग थोपवण्याचे नवे आव्हान : दूध उत्पादनावर परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी होत असतानाच जनावरांना ‘अफलाटॉक्सीकॉसीस’ अर्थात ‘डेग्नाना’ या नवीन रोगाची लागण होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ माजली आहे. मागील काही दिवसांपासून या रोगाची लक्षणे असलेली जनावरे आढळून आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. शिवाय रोगाला थोपविण्याचे नवे आव्हान पशुसंगोपनासमोर आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे भाताचे पिंजर भिजलेले असल्यामुळे त्याच्यावर बुरशीची (फंगस) झपाटय़ाने वाढ झाली. दरम्यान गवत पूर्ण न वाळवता साठवल्यामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे गवतावर बुरशीयुक्त फंगस तयार झाला आहे. त्यामुळे जनावरांना ‘डेग्नाना’ या नवीन रोगाची लागण होत आहे. या रोगाची लागण झालेली जनावरे जिल्हय़ात अधिक प्रमाणात आढळून आली आहेत.
या रोगामुळे जनावरांचे केस गळून शेपूट टोकाकडून वाळत जाते. शिवाय दूध क्षमता कमी होऊन जनावरे आजारी पडतात. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान पशुपालकांनी या रोगाबाबत लक्षणे दिसून आल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक जनावरे या संसर्गजन्य रोगाची शिकार बनली आहेत. मात्र या रोगाबाबत म्हणावी तशी जनजागृती नसल्याने पशुपालकांना हा आजार सहज लक्षात येत नाही. या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. तसेच खबरदारी म्हणून पशुपालकांनी चांगल्या जातीच्या गवताचा वापर करावा. शिवाय गोठा दररोज स्वच्छ करावा.
रोगाची लक्षणे
भूक मंदावणे, दूध क्षमता कमी होणे
केस गळून पडणे, शेपूट टोकाकडून वाळत जाणे.
पायांना खुराजवळ बऱया न होणाऱया जखमा होणे
कान वाळत जाणे, जनावरांचे वजन कमी होणे
दूध निर्मितीत मोठय़ा प्रमाणात घट होणे
प्रतिबंधात्मक उपाय
भिजलेले बुरशीयुक्त गवत घालणे बंद करावे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱया औषधांचा वापर करावा उदा. कॅलवीट, फोर्ट.
खनिज मिश्रणांचा वापर करावा.
तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱयांचा सल्ला घ्या
जिल्हय़ात ‘डेग्नाना’ रोगाची लक्षणे असलेल्या जनावरांची संख्या कमी प्रमाणात आहे. या रोगाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱयांचा सल्ला घ्यावा. सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय पशुपालकांनीदेखील खबरदारी घ्यावी.
ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)









