वार्ताहर /कणकुंबी
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी कणकुंबी वनखात्याच्या व्याप्तीत असलेल्या हुळंद येथे दोन दिवसात दोन जनावरे खाऊन फस्त आणि तीन जनावरांना जखमी करणारा वाघ कणकुंबी वनखात्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे.
27 जानेवारी रोजी येथील शेतकरी दामोदर रामा गावडे यांची एक म्हैस वाघाने जागीच ठार केली होती. तर अन्य तीन जनावरे गंभीर जखमी केली आहेत. दि. 29 रोजी हुळंद येथील शेतकरी केशव अर्जुन गावडे यांची गाय वाघाच्या हल्ल्यात बळी पडली. त्यानंतर वनखात्याने वाघाचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी वाघाने ज्या ठिकाणी गायीचा फडशा पाडून अर्धवट सोडून दिले होते, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला होता. कारण अर्धवट राहिलेले मांस खाण्यासाठी वाघ पुन्हा त्या जागी येऊ शकतो, याची खात्री असल्याने वन खात्याच्या अधिकाऱयांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला. दुसऱया दिवशी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता वाघाची छबी दिसून आली. वाघाने त्याच रात्री आणि दिवसादेखील त्या ठिकाणी येऊन गायीचे शिल्लक मांस खाल्ले. जवळपास दोन-तीनवेळा वाघाने त्या ठिकाणी ये-जा करून शिल्लक मांसावर ताव मारला, असे चित्र कॅमेऱयात कैद झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे वाघ असल्याची खात्री
आजपर्यंत वाघाने ठिकठिकाणी जनावरे खाल्ल्याचे वृत्त ऐकायला मिळत होते. परंतु, वाघाला प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचा पुरावा नव्हता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे वन खात्याला आता खात्री पटली असून वाघ कॅमेऱयात कैद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाघाबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कणकुंबी आणि परिसरामध्ये वाघाच्या पायाचे ठसे अनेक ठिकाणी मिळाले होते. परंतु कॅमेऱयामध्ये वाघ पहिल्यांदाच कैद झाला आहे.
कणकुंबी-हुळंद परिसरामध्ये शेतकऱयांनी तसेच महिलावर्गाने फिरू नये, असे आवाहन वन खात्याने केले आहे. कालमणी, गोल्याळी येथील अनेक जनावरे वाघाच्या हल्ल्यात बळी पडली आहेत. परंतु वन खात्याकडून कोणतीच खबरदारी घेतली गेली नाही.
हुळंद गावच्या विद्यार्थ्यांनी जवळून पाहिला वाघ
कणकुंबी येथे येणाऱया हुळंद येथील आठ-दहा विद्यार्थ्यांना वाटेमध्येच वाघाचे जवळून दर्शन झाले. त्यावेळी त्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र पळून जाणार तरी कसे, ते केवळ वाघाकडे बघतच राहिले. कणकुंबी विद्यालयात नववीत शिकणाऱया नागेश सुतार आणि उमेश गावडे या विद्यार्थ्यांनी केवळ पंधरा-वीस फूट अंतरावरून जाणारा वाघ पाहिल्याने दोन्ही विद्यार्थ्यांची बोबडीच वळली. रस्ता ओलांडून वाघ जंगलात गेल्यानंतर विद्यार्थ्यांचा जीव भांडय़ात पडला. हुळंद गावातील सात ते आठ विद्यार्थी दररोज 18 किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेला ये-जा करतात. घनदाट जंगलातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यापूर्वी अस्वल, गवीरेडे, डुक्कर, लांडगे व इतर हिंस्त्र प्राणी विद्यार्थ्यांना अनेकवेळा रस्त्यात आढळले. परंतु, वाघ मात्र पहिल्यांदाच दृष्टीस पडल्याने विद्यार्थ्यांची पाचावर धारण बसली. घनदाट जंगलातून पायी ये-जा करणे अतिशय धोकादायक ठरले आहे. शाळेला रामराम ठोकावा की, जीव धोक्मयात घालून शाळेला यावं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वनखात्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्हा वनाधिकारी यांना भेटून अधिकाऱयांच्या निदर्शनास समस्या आणून दिल्या. परंतु वनखात्याने जंगलातून येणाऱया विद्यार्थ्यांसाठी अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. याकडे लोकप्रतिनिधी, वरि÷ अधिकारी लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देतील काय, असा प्रश्न पडला आहे.









