काठमांडू / वृत्तसंस्था
भारतीय लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांना नेपाळ सैन्याच्या जनरल पदाचा मान देण्यात आला. नरवणे यांना हा सन्मान नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळय़ानंतर नरवणे यांनी नेपाळी लष्करप्रमुखांशीही चर्चा केली. आता ते शुक्रवारी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा यांची भेट घेतील.
लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे बुधवारपासून नेपाळच्या तीन दिवसांच्या दौऱयावर आहेत. नरवणे यांना नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांनी आमंत्रित केले होते. नेपाळशी सीमा विवादानंतर नरवणे यांची ही पहिली भेट आहे. काठमांडू येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात लष्करप्रमुखांनी भारताच्या वतीने नेपाळला वैद्यकीय मदत दिली. यात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे समाविष्ट होती.
नेपाळच्या लष्करी मुख्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात जनरल नरवणे यांना नेपाळ सैन्याच्या मानद जनरल पदाचा दर्जा देण्यात आला. ही 70 वर्षांपासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. 1950 पासून भारत-नेपाळदरम्यान सुरू असलेल्या परंपरेअंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या सैन्यप्रमुखांना मानद पद देतात. 1950 मध्ये भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख कमांडर इन चीफ जनरल केएम करिअप्पा यांना हे पद सर्वात पहिल्यांदा देण्यात आले होते. त्यापासून ही परंपरा सुरू झाली आहे.









