डॉ. दीपा मलिक यांचे आवाहन, पणजीत डॉ. कोसंबी विचार महोत्सवाचे दुसरे व्याख्यान
प्रतिनिधी/ पणजी
शरीर निकामी (पॅरॉलाईझ) झाले तरी आत्मा कधीच निकामी होत नाही, असा संदेश डॉ. दीपा मलिक यांनी डॉ. कोसंबी विचार महोत्सवात देऊन जनतेने दिव्यांगांविषयी विचार बदलावेत आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना कमी लेखू नये, असे आवाहन केले. पणजी येथील कला अकादमीत महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
पद्मश्री, अर्जुन, खेलरत्न असे विविध पुरस्कार मिळवून देशात कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱया डॉ. मलिक यांनी तरुण पिढीला सुयोग्य असे मार्गदर्शन केले. लहानपणापासून काढलेले कठीण दिवस आणि त्याच कठीण परिस्थितीतून पॅराऑलिंपिकमध्ये केलेला यशस्वी वाटचालीचा एकंदरित लेखा जोखा त्यांनी व्याख्यानातून मांडला.
इच्छाशक्तीने कोणतेही लक्ष्य गाठू शकता
आव्हाने आली तर डगमगू नका, त्यातून वाट काढा, त्यांना समर्थपणे तोंड द्या, मग तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. शारीरिक व्याधी असली तरी इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही लक्ष्य तुम्ही गाठू शकता, असे डॉ. मलिक यांनी नमूद केले.
स्वतः आनंदी रहा, दुसऱयांना आनंदी ठेवा
सुमारे एक तासाच्या व्याख्यानात डॉ. मलिक यांनी आपला सारा जीवनपट श्रोत्यांसमोर मांडला. त्यातील अनेक चढ उतार त्यांनी उलगडून सांगितले. त्यांचे व्हिडीओ देखील सादर केले. गोव्यात त्यांनी अनेकदा भेट दिली आणि त्याचेही व्हिडीओ दाखविले. स्वत: आनंदी रहा, दुसऱयाना आनंदी ठेवा असेही त्या म्हणाल्या.
दिव्यांग असल्याने वाहनचालक परवान्यास उशीर
जगताना शिकत रहा म्हणजे जिंकणे सोपे होते. ध्येय साकार करताना धोडा धोकाही पत्करावा लागतो. त्यातूनच शिकायला मिळते. आत्मविश्वास ढळू देऊ नका, दिव्यांग असल्यामुळे वाहनचालक परवाना लगेच मिळाला नाही. तो मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु शेवटी 19 महिन्यानंतर वाहनचालक परवाना मिळाला. त्यासाठी मोटर वाहन कायदय़ात दुरुस्ती करावी लागली, असे त्यांनी सांगितले.
पॅरा ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलेला पदक मिळवण्यासाठी 17 वर्षे जावी लागली, असेही त्यांनी निदर्शनास आणले. दिव्यांगांचे सशक्तीकरण करा, असा संदेशही त्यांनी व्याख्यानातून दिला. कष्ट, मेहनतीला पर्याय नाही, क्रीडा प्रकारात तसेच दुचाकीवरील प्रेमामुळे विवाह योग जुळून आला, असा किस्साही त्यांनी ऐकवला व शेवटी श्रोत्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.









