काँग्रेसचे सचिन परब यांचे प्रतिपादन, मांद्रे मतदारसंघात ऑक्सिजन सिलिंडर वितरीत
प्रतिनिधी / मोरजी
कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी आणि गरजवंताना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ईश्वराने आपल्याला चांगले आरोग्य द्यावे. आपण जनसेवा ही ईश्वर सेवा मानून कार्य करीत राहीन. मांदेवासीयांची सेवा करण्यासाठी आपल्याला जनतेचा तसाच ईश्वराचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन मांदेचे युवा काँग्रेस नेते सचिन परब यांनी केले. मांदे मतदार संघातील कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्याबरोबरच वैद्यकीय डिव्हाइस वितरीत केल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते.
ऑक्सिजन सांद्रता एक वैद्यकीय डिव्हाइस आहे. जे सभोवतालच्या हवेपासून ऑक्सिजनवर लक्ष केंद्रीत करते. देशात कोविड 19 केसेस वाढल्याने या उपकरणाला मोठय़ा प्रमाणात मागणी असते. किमान 60 हजार रुपये त्याची किंमत असते. अशी उपकरणे मांदेमतदार संघातील गरजवंताना दिली आहेत, असे सचिन परब यांनी सांगितले.
मांदे मतदारसंघात सर्वत्र कौतुक
लॉकडाऊन काळात मदतीला धावून येतात ते देवदूत ठरत असतात. निस्वार्थी भावनेने लॉकडाऊन काळात अविरत कार्य करणाऱया युवा उद्योजक सचिन परब यांच्या कार्याचे मांदे मतदार संघात सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राजकारण बाजूला ठेवून आजही सचिन परब गरजवंताला मदतीचा हात देत आहेत. मांदे मतदारसंघात काँग्रेसच्या कठीण काळात परब कुटुंबियांनी या पक्षाचे कार्य निस्वार्थी भावानेने पुढे नेले. मात्र प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी परब कुटुंबियाना हुलकावणी देत गेली. मात्र पक्ष हित समोर ठेवून त्यांचे कार्य अविरत चालू आहे.
गरजवंतांसाठी मदतीचा हात
लॉकडाऊन काळात सचिन परब हे स्वतःजवळील पदरमोड करून मांदे मतदार संघातील गरजवंताना मदतीचा हात देण्यास सक्रीय झाले. सुरुवातीला कडधान्य, भाजीपाला, मेडिसीन आणि आता घरातून बाहेर पडणाऱयानी सुरक्षित असावे यासाठी नागरिक व पंचायतीना मास्क आणि सॅनिटायझर वितरीत केले.
लॉकडाऊन काळातही विविध उपक्रम
केवळ लॉकडाऊन काळातच नव्हे तर इतरवेळीही गरजवंतांना मदत सचिन परब यांनी केली आहे. या पूर्वी दुचाकी वाहनधारकांना मोफत हॅल्मेट, बेरोजगार मेळावा, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, मोफत औषधे, शिक्षणासाठी मदत आणि आता तर लॉकडाऊन काळात विविध उपक्रम राबवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.
जनतेचे आशीर्वाद पुढील कार्यासाठी प्रेरणादायी
आपण या समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत, ज्याना गरज असते त्याना योग्य वेळी मदत करणे हीच खरी माणुसकी. तो अमुक पक्षाचा किंवा आपल्या ओळखीचा नाही हा भेदाभेद आपण कधीच करत नाही, लॉकडाऊनचा काळ हा कठीण काळ आहे. ज्याना अडचणीवेळी आपण मदत केली त्यावेळी लोकांनी दिलेले आशीर्वाद हे आपल्या पुढील कार्यासाठी प्रेरणा देत असतात असे सचिन परब यांनी सांगितले.









