मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही : राज्यातील संपादकांशी साधला संवाद : गैरसमज, भीती दूर होणे आवश्यक : कोरोनामुळे एकही रुग्ण दगावता कामा नये : बाधितांपैकी केवळ 19 जणांना कोविड – 19 : आरोग्य कर्मचाऱयांची बाधा उशिरा समजली : गोव्यात सध्या कोरोनाच्या पाच प्रयोगशाळा : गोव्याच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर
प्रतिनिधी / पणजी
राज्यात आजपासून बाहेरून येणाऱयांसाठी नवी नियमावली लागू करण्यात येत आहे. त्यानुसार गोव्यात प्रवेश केल्यावर थेट ‘होम क्वारंटाईन’ व्हावे किंवा रु. 2000 भरून तपासणी करून घ्यावी लागेल. प्रयोगशाळेतून अहवाल येईपर्यंत सशुल्क अलगीकरणामध्ये रहावे लागेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील घोषणा केली आणि राज्यातील जनतेची काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे. केवळ जनतेच्या मनातून कोविड-19 बाबत असलेले गैरसमज व भीती दूर होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी काल सोमवारी मनसोक्तपणे चर्चा केली. कोविड-19 चा फैलाव व लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री प्रथमच संपादकांशी बोलले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव, आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन उपस्थित होत्या.
कोरोनामुळे एकही रुग्ण दगावता कामा नये
राज्यात कोरोनामुळे एकही रुग्ण दगावता कामा नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत जे 300 बाधित सापडले ते सर्वजण रुग्ण आहेत असे आपण म्हणणार नाही. या 300 पैकी मांगोरहिल येथील बाधितांची संख्या 275 आहे. यात आरोग्य केंद्रात काम करणाऱया आठ कर्मचाऱयांचाही समावेश आहे. मांगोरहिलपूर्वी जे 45 रुग्ण होते त्यातील 23 जण बरे होऊन घरी गेले. अठराजणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
बाधितांपैकी केवळ 19 जणांना कोविड – 19
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व बाधितांपैकी केवळ 19 जणांना कोविड-19 ची बाधा आहे जे रुग्ण आहेत. उर्वरित 209 जणांना कोविड-19 इस्पितळात ठेवण्यात आले आहे. परंतु त्यांच्यावर कोणतेही उपचार होत नाहीत. केवळ ताप वा सर्दी झाल्यासच त्यांना क्रोसिन वा अन्य गोळय़ा, औषधे दिली जातात. हे बाधित अतिशय चांगले उत्साहात आहेत. त्यांच्यावर कोणतेही टेन्शन नाही. हे सर्वजण बरे होतील.
आरोग्य कर्मचाऱयांची बाधा उशिरा समजली
मांगोरहिल प्रकरणी आरोग्य खात्याची वा तेथील आरोग्य कर्मचाऱयांकडून कोणतीही हेळसांड झालेली नाही. जी व्यक्ती हैद्राबादहून परत गोव्यात आली त्या व्यक्तीला बाधा झाली होती. आंध्रमधून मासे घेऊन गोव्यात येतात त्यांच्या संपर्कात तो आला होता. त्याच्या घरातून हा कोविड फैलावला. आरोग्य कर्मचारी मांगोरहिल येथे फैलावलेल्या डेंग्युबाबत जनतेची तपासणी करीत असता, त्यांनाही त्याची बाधा झाली. त्यामुळे हा प्रकार थोडय़ा उशिरानेच लक्षात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोणीही कोविड-19 मुळे घाबरू नये
कोणीही कोविड-19 मुळे घाबरू नये. मांगोरहिलवरील सुमारे 75 जण जे बाधितांच्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःहून तपासणी करून घेतली. त्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे.
गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येकास : आजपासून ‘थर्मल स्कॅनर’ सक्ती
केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही आजवर काम करीत आलो आहोत. आज मंगळवारपासून नियमावलीत थोडे बदल घडवित आहोत. आतापर्यंत राज्यात येणाऱया प्रत्येकाची कोविड-19 तपासणी सक्तीची होती. त्यासाठी प्रत्येकाकडून रु. 2000 स्वीकारले जायचे. आजपासून येणाऱया प्रत्येक व्यक्तीला ‘थर्मल स्कॅनर’मधून पुढे जावे लागेल. त्यातून कोणाला बाधा आहे वा त्यांची सिग्नल्स समजतील, अशी कोविड-19 तपासणी केली जाईल. इतर सर्वांना थेट त्यांच्या वा ते जाणार असलेल्या नातेवाईकाच्या घरी वा स्वतःच्या घरी जाऊन अलगीकरण करून घ्यावे लागेल. अलगीकरणाची इच्छा नसेल तर त्याने रु. 2000 भरून कोविड तपासणी करून घ्यावी आणि प्रयोगशाळेतून अहवाल येईपर्यंत दिवसाकाठी रु. 2000 प्रमाणे अलगीकरणात रहावे लागेल.
गोव्यात कोरोनाच्या पाच प्रयोगशाळा
आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सांगितले की गोव्यात 25 फेब्रुवारीपर्यंत कोविड तपासणीसाठी एकही प्रयोगशाळा नव्हती. आज आमच्याकडे गोमेकॉ, आझिलो, हॉस्पिसियु, फोंडा व चिखली या पाच इस्पितळांत प्रयोगशाळा आहेत. गोव्यात सध्या दररोज 100 जणांची प्रयोगशाळेत तपासणी होते. पुढील आठवडय़ात उच्च पातळीवरील प्रयोगशाळा सुरू करीत आहोत, ज्यामधून दिवसाकाठी 456 नमुन्यांची तपासणी होईल. सध्या सुमारे दोन हजार नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता आलेले आहेत.
गोव्याच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर
गोव्याबाहेरून येणाऱया 1800 जणांची तपासणी केली जाते. गोव्यात येणारे मालवाहू ट्रक वा अन्य वाहनांच्या प्रत्येक चालकाची व वाहकाची तपासणी करता येणार नाही. तसे केल्यास सर्व ठिकाणी रांगा लागतील. तसेच केंद्राने जी नवी नियमावली लागू केलेली आहे त्या तत्वात हे बसणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना गोव्याच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर बसविण्यात आलेले आहेत. शिवाय रेल्वेस्टेशन, विमानतळांवरही ती बसविण्यात येत आहेत. ज्यामुळे येणाऱया प्रत्येकाची तपासणी होत राहील.
सध्या जे बाधित आहेत ती संख्या काही दिवस वाढणारी असली तरी त्यामुळे गंभीर धोका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जनतेने गैरसमज दूर करावा. यातून दगावणाऱयांचे प्रमाण अत्यल्प आहे, असे ते म्हणाले.









