ऑनलाइन टीम / पालघर :
जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पालघरमध्ये आयोजित भाजपाच्या कार्यकरर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
ते म्हणाले, सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात रान पेटवलं, कायम त्यांच्यावर टीका केली. त्या बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
सरकारवर टीका करताना ते म्हणाले, शेतकऱयांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती मात्र ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही. सत्तेत आलेल्या सरकारने फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही तर शेतकऱयांशी आणि जनतेशी प्रतारणा केली आहे.









