प्रतिनिधी/ मडगाव
‘कोरोना व्हायरस’ची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला काल रविवारी दक्षिण गोव्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकी व कार तुरळक वाहतूक वगळता जनता कर्फ्यू यशस्वी झाला. रूमडामळöदवर्ली येथे काल सकाळी पोलिसांनी एका युवकावर लाठीमार केल्याची घटना सोडली तर जनता कर्फ्यू शांततेत झाला.
कोरोना विषाणूच्या संकटापासून सुरक्षित राहण्यासाठी काल सर्वांनीच घरातच राहणे पसंत केले. डॉक्टर, नर्स तसेच औषधालये, पोलीस कर्मचारी व पत्रकार नेहमीप्रमाणे आपल्या कार्यात व्यस्थ राहिले.
गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखण्यात येणारे मडगाव शहर पूर्णपणे बंद राहिले. न्यू मार्केट, गांधी मार्केट, विद्यानगर, बोर्डा तसेच फातोर्डा परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दक्षिण गोव्याच्या किनारपट्टी भागातसुद्धा जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोलिसांचे न ऐकणाऱया युवकावर लाठीमार
काल, सकाळी दुचाकी घेऊन फिरणाऱया एका युवकावर पोलिसांनी लाठीमार केला. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांनी रूमडामळ-दवर्ली येथील अंजूमन हायस्कूलजवळ दुचाकी घेऊन फिरणाऱया युवकाला लाठीने झोडपले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा युवक अतिउत्साहीपणा करीत होता. मारहाण करण्यापूर्वी पोलिसांनी त्याला दोन वेळा इशारा दिला होता व घरी जाण्याचा सल्ला दिला होता. तरीसुद्धा तो पोलिसांना गुंगारा देऊन दुचाकी घेऊन फिरत होता. शेवटी पोलिसांचा संयम सुटला व त्याला लाठीचे तडाखे पडले. या लाठीमाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले.
पोलीस उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक याच्या कृतीची दखल दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस व उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी घेऊन त्याला, त्वरित सेवेतून बाजूला केले व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
तेजसकुमारवर कारवाई न करण्याची मागणी
उपनिरीक्षक तेजसकुमार नाईकची कृती योग्यच असल्याचे अनेक संदेश काल सोशल मिडियावरून पुढे आले. अनेकांनी त्यांच्या कृतीचे समर्थन करताना, उनाड युवकांना वठणीवर आणण्यासाठी अशी कृती आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पोलीस खात्याने त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी देखील सोशल मिडियावरून करण्यात आली आहे.
कोंकण रेल्वेच्या गाडय़ा पहिल्यांदाच बंद
जोरदार पाऊस असो किंवा वादळ असो, कोंकण रेल्वेच्या प्रवासी गाडय़ा कधीच बंद झाल्या नव्हत्या. पण, कोरोना व्हायरसमुळे त्या काल रविवारी पहिल्यादाच बंद झाल्या. कोंकण रेल्वेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता. कोंकण रेल्वे स्थानक दिवस-रात्र प्रवाशांनी गजबजले असायचे. पण, काल हे स्थानक पहिल्याच निर्मनुष्य झाले होते. रेल्वे स्थानकावर येणाऱया लोकांची पोलीस चौकशी करायचे व रेल्वे बंद असल्याने माघारी पाठवायचे.
गोव्याच्या ग्रामीण भागात देखील लोकांनी जनता कर्फ्यूला सहकार्य केले. मात्र, सद्या काजू पीकाचा हंगाम सुरू असल्याने, काजूची बोंडे गोळा करणे, त्यांचा रस काढणे व दारू गाळण्याचे काम मात्र, नेहमी प्रमाणे सुरूच होते.