जिल्हा प्रशासनाकडून 45 वर्षांवरील नागरिकांना लस
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 28 एप्रिलच्या रात्री 9 पासून 12 मेच्या सकाळी 6 पर्यंत कर्नाटकात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. कर्फ्यूच्या काळातही लसीकरणाची मोहीम सुरू राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शहरी भागातील 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणीनंतर लसीकरणासाठी बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवावे. लसीकरणासाठी ठरविलेली तारीख (ऑनलाईन प्रत) सोबत ठेवणे गरजेचे आहे.
केवळ शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंदे व उपकेंद्रांतूनही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी आवश्यक गट तयार करण्यात येणार आहेत. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार असून त्यांना ओळखपत्र किंवा पास देण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या किंवा अधिकृत स्वयंसेवक लसीकरणासाठी आवश्यक चिठ्ठी किंवा पास देणार आहेत. पंचायत राज व ग्रामीण विकास खात्याकडून कोविड-19 लसीकरणासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या वाहनांना आवश्यक पास व स्टीकर देण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रांची क्षमता लक्षात घेऊन एका गटात 5 ते 10 जणांना लस देता येणार आहे.
लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधारकार्ड सोबत नेणे बंधनकारक आहे. लसीकरण केंद्रांवर झुंबड होऊ नये, शिस्त पाळावी यासाठी पोलीस, एनएसएस, एनसीसीची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येकांनी कोरोना मार्गसूचींचे पालन करण्याची गरज आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी पत्रकात म्हटले आहे.