अफगाणिस्तानात अपहरण अन् मारहाण, 17 वर्षांपासून जगभ्रमंतीवर
27 मे 2004 रोजी 21 वर्षांचा सोमेन देवनाथ सायकलवर स्वार होऊन जगाची सैर करण्यासाठी निघाला. जगभरात एड्सविषयी जनजागृती करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते. या प्रवासादरम्यान जंगलात वास्तव्य, अनेक दिवशी उपासमार, लुटमारीचे शिकार, मारहाणही झाली. एवढेच नाही तर अपहरणही करण्यात आले आहे, पण या इसमाने हार मानली नाही. 17 वर्षांनंतरही त्याचा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत 157 देशांचा प्रवास केला असून 1.7 लाख किलोमीटरचे अंतर सायकलने कापले आहे. सध्या तो अमेरिकेच्या दौऱयावर आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगण्यातील वासंती या छोटय़ा गावातील रहिवासी असलेला सोमेन सामान्य कुटुंबाचा सदस्य आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने एड्सविषयीचा लेख वृत्तपत्रात वाचला, त्यानंतर त्याने माहिती गोळा करण्यास प्रारंभ केला. तेव्हा एड्सबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. दोन वर्षांनी सोमेनने सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल स्टेट एड्स कंट्रोलकडून विशेष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तो लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बाहेर पडला. सुरुवात त्याने स्वतःच्या गावापासून करत मोहीम चालूच ठेवली. याचदरम्यान त्याने पदवीही मिळविली.
या मोहिमेला आकार देण्यासह देशभरातील लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता त्याने सायकलने सैर करण्याची योजना आखली. सर्वप्रथम त्याने ईशान्य भारताची सैर केली, शाळा-महाविद्यालयांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये जात त्याने जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोमेनने त्यानंतर देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करण्यास सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी तो सायकलनेच प्रवास करायचा. लोक त्याला मदत करण्यासह जेवणाची व्यवस्था करायचे.

जगभ्रमंतीचा प्लॅन
भारताचा प्रवास पूर्ण केल्यावर जागतिक जागृतीचा कार्यक्रम आखला. 2007 मध्ये आशियातून प्रवासाची सुरुवात केली. नेपाळपासून सुरुवात करत 2009 पर्यंत आशियातील 28 देशांचा दौरा केला. त्यानंतर युरोप आणि 45 देशांना भेट दिली. आफ्रिका, मध्यपूर्व, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, उत्तर अमेरिकेसह 157 देशांमध्ये पोहोचल्याचे तो सांगतो. 191 देशांचा दौरा करण्याचे त्याचे लक्ष्य आहे. 2022 पर्यंत स्वतःची मोहीम पूर्ण केल्यावर भारतात परतणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
अफगाणिस्तानात अपहरण
सोमेनला प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. अनेकदा मारहाण आणि लूटपाटही झाली. 2007 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानने त्याचे अपहरण केले होते. 23 दिवसांपर्यंत त्याला काळोख्या खोलीत डांबण्यात आले होते. 24 व्या दिवशी तालिबानने त्याची मुक्तता केली होती.
निधीची व्यवस्था
17 वर्षांपूर्वी प्रवासास सुरुवात करताना सोमेनच्या खिशात केवळ 423 रुपये होते. प्रवासात अनेक लोकांचा आणि विविध देशांमधून त्याला पाठिंबा मिळाला आहे. भारत सरकार त्याला व्हिसा सुलभपणे उपलब्ध करून देते. सरकारने 50 हजार रुपयांची मदतही केली आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहाय्य केले आहे.









