मुंबई /प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईतून सुरु झालेली राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. भाजपबरोबर सत्ताधारी महाविकास आघाडी देखील राणेंच्या यात्रेवर लक्ष ठेवून आहे. याचदरम्यान नारायण राणे यांना आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.
राणे-राजनाथ सिंह संवाद कॅमेरात कैद
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कोकणात आहे. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा फोन आला. राणेंना- राजनाथ सिंहांचा आलेला फोन हा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होता. ज्यावेळी राणे बोलत होते त्यावेळी माध्यमांचे कॅमेरे साहजिक राणेंवर खिळलेले होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद झाला.
राजनाथ सिंह यांचा राणेंना फोन, राणे म्हणाले
जनआशीर्वाद यात्रे दरम्यान राजनाथ सिंह यांचा राणेंना फोन आला. राजनाथ सिंहांनी तब्येत बरी आहे का विचारल्यावर राणे म्हणाले, “सर मेरी तबीयत ठीक हैं… हॉस्पिटल में नहीं था… घर पर ही था…. तबियत बिगडी है ऐसी उन्होंने हवा कर दी”… यावर राजनाथ सिहांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसंच उर्वरित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.