ऑनलाईन टीम
जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील चार मंत्र्यांनी या यात्रेस प्रारंभ केला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मध्यप्रदेशमध्ये या यात्रेस सुरुवात केली. मात्र या जनआशीर्वाद यात्रेतून भाजपच्याच वरिष्ठ नेत्याला धक्के मारुन बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तर विरोधकांनी याप्रकारावरुन भाजपवर टीका केली आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू हे या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान यावेळी त्यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी मालू यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना यात्रेत सहभागी होऊ दिलं नाही. भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रणात आणत होते. त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू व्यासपीठाजवळ पोहोचले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्के मारुन बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याप्रकारावरुन काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला. ‘इंदूर भाजपचे वरिष्ठ नेते गोविंद मालू यांच्यासोबत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान गैरवर्तन करण्यात आलं. त्यांना पोलिसांनी धक्के मारून बाहेर काढलं. गद्दारांची पूजा होतेय आणि निष्ठावंत धक्के खात आहेत,’ असा टोला मध्य प्रदेश काँग्रेसनं ट्विटरवरून लगावला आहे.
Previous Articleसोलापूर : पेटीत पैसे ठेवले की दुप्पट
Next Article कोल्हापूर : व्हेंटिलेटरनी घेतला `मोकळा श्वास’









