सुमारे आठ लाखांचा दंड
प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी येथे महसूल विभागाने कोरड्या नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्याऱ्या ठिकाणी छापा टाकून ५ वाहने ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील यांच्या पथकाने यांनी केली आहे. यात एक जेसीबी, तीन 407 टेम्पो, एक डंपर ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे.
ही कारवाई प्रांताधिकारी प्रशांत आवटे, याच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील, मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे, प्रशांत बुचडे, तलाठी दुष्यंत पाटील,विशाल उदगिरे, राजेश चाचे, निखिल पाटील,अनिल हिप्परकर, स्वप्नील घाडगे ,अभिजित सोंनपुराते, बालटे, बागलवाडीच्या सरपंच सौ. लक्ष्मी खांडेकर कोतवाल प्रवीण काळे व स्थानिक पोलीस पाटील यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जत तालूक्यातील कोरडा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणत होत आहे. परिणामी पाण्याची पातळी कमी होत आहे. नदी पात्राच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. तहसिलदार सचिन पाटील यांनी वाळू तस्करांना कारवाई लक्षात येऊ नेये म्हणून शुक्रवारी रात्री मोटरसायकलवरून प्रवास करत वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला .
ही कारवाई पहाटेपर्यंत सुरूच होती. वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी एक जेसीबी दिसून आला. वाळू तस्करी विरोधी पथक आल्याचे समजताच वाहने चोरट्या मार्गाने पळवू लागले. दरम्यान बेकायदेशीर वाळू भरलेला डंपर वेगाने जात होत होता. सिंगनहळ्ळी येथील महादेव मंदिराजवळ डंपरला वळसा न बसल्याने डंपर जागीच पलटी झाला. या डंपरमध्ये तीन ब्रास वाळू भरली होती याचा पंचनामा करण्यात आला आहे.
तसेच थोड्याच अंतरावर मोहन खिलारे यांच्या मालकीचे व वापरात असणारी टेम्पो शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे सापडला आहे. काही अंतरावर असलेले हनमंत खिलारे, शंकर शिंदे यांचे देखील टेम्पो ताब्यात घेऊन जत पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांना सुमारे आठ लाखा पर्यंत दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. वाळू उत्खनन केलेल्या ठिकाणी मोजमापे घेऊन दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.