मुंबई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शुक्रवारी धोनीसमवेतचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत धोनीला भेटण्याची आपल्याला पूर्वीप्रमाणेच उत्सुकता असते, असे नमूद केले. जडेजाने गुरुवारी आपला क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केला आणि त्यानंतर तो आगामी आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नई संघात दाखल झाला. जडेजा यापूर्वी अंगठय़ाच्या दुखापतीमुळे जवळपास तीन महिने बाहेर होता. मात्र, चेन्नईचा संघ आयपीएलमधील आपल्या सलामी लढतीसाठी दि. 10 रोजी मैदानात उतरेल, त्यावेळी जडेजाचे संघातील स्थान जवळपास निश्चित स्वरुपाचे आहे. चेन्नईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्स संघाने देखील ट्वीटरवर जडेजा व सुरेश रैना यांच्यातील हास्य संवादाच्या क्षणी टिपलेले छायाचित्र शेअर केले आहे. जडेजाने चेन्नई संघात दाखल होण्यापूर्वीच स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली असून मार्चमध्ये त्याने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर कसून मेहनत घेतली आहे.
जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी फलंदाजी करत असताना जडेजाच्या डाव्या अंगठय़ावर चेंडू आदळला होता. त्यानंतर स्कॅनिंगमध्ये दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले व त्याला दीर्घ विश्रांती घ्यावी लागणार असल्याचेही वैद्यकीय पथकाने जाहीर केले होते.









