बहुतांशी दिग्गज फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे प्रँचायझींची निराशा
मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत 70 सामने झाले असून सनरायजर्स हैदराबाद व पंजाब किंग्स यांच्यातील शेवटच्या लढतीने साखळी फेरीची सांगताही झाली आहे. एकीकडे, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ससारखे अव्वल संघ प्रारंभीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले तर लखनौ-गुजरातसारख्या नवोदित संघांनी उत्तम खेळ साकारला. अर्थात काही दिग्गज यंदा खूपच अपयशी ठरले आणि यामुळे त्यांच्या प्रँचायझीची निराशा झाली. पहिल्या 70 सामन्यातील आकडेवारीनुसार, केन विल्यम्सन, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, मयांक अगरवाल, महेंद्रसिंग धोनी, इशान किशन या अव्वल फलंदाजांनी निराशा केली असून केन विल्यम्सनची एक धाव 6 लाख 48 हजार रुपयांना तर रोहित शर्माची एक धाव 5 लाख 97 हजार रुपयांना पडली असल्याचे अधोरेखित झाले आहे.
यंदा चेन्नईचे नेतृत्व सोपवले गेलेल्या रविंद्र जडेजाला चेन्नईने 16 कोटी रुपयांना करारबद्ध केले. मात्र, जडेजाने कर्णधार व खेळाडू या दोन्ही नात्यांनी निराशा केली. 8 सामन्यात नेतृत्व सांभाळत असताना 6 वेळा जडेजाच्या या संघाला पराभव पत्करावे लागले. जडेजाने 10 सामने खेळत 116 धावा केल्या. त्याची एक धाव तब्बल 13 लाख 80 हजार रुपयांना पडली.
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला हैदराबादने 14 कोटी रुपयांना रिटेन केले. पण, त्याला 13 सामन्यात केवळ 216 धावा करता आल्या. यादरम्यान त्याला एकच अर्धशतक नोंदवता आले. त्याची एक धाव संघाला साडेसहा लाख रुपयांना पडली.
पंजाबचा कर्णधार मयांक अगरवालला 12 कोटी रुपये मोजत रिटेन केले गेले होते. त्यालाही 13 सामन्यातील 12 डावात केवळ 196 धावा करता आल्या. त्याची एक धाव 6 लाख 15 हजार रुपयांना पडली. मुंबईच्या रोहित शर्माची स्थिती यापेक्षाही खराब राहिली. 16 कोटी रुपयांना करारबद्ध रोहितला 14 सामन्यात 268 धावा करता आल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट केवळ 120 इतका राहिला. यामुळे, रोहितच्या एका धावेची किंमत 5 लाख 97 हजार रुपये इतकी झाली. मुंबई यावेळी 8 गुणांसह सर्वात शेवटी दहाव्या स्थानी फेकली गेली.
याशिवाय, चेन्नईचा अव्वल खेळाडू धोनीने प्रारंभी आश्वासक सुरुवात केली असली तरी 14 सामन्यातील 13 डावात केवळ 232 धावा केल्या. चेन्नईने त्याला 12 कोटी रुपयांना रिटेन केले होते. त्यानुसार, त्याची एक धाव चेन्नईसाठी 4 लाख 47 हजार रुपयांना पडली. मुंबईने 15.5 कोटी रुपयांना करारबद्ध केलेल्या इशान किशनने 14 सामन्यात 418 धावा केल्या. त्याची एक धाव 3 लाख 70 हजार रुपयांना पडल्याचे आकडेवारीवरुन अधोरेखित झाले.
फलंदाज / संघ / मानधन / केलेल्या धावा/ एका धावेची किंमत
रविंद्र जडेजा / चेन्नई / 16 कोटी / 116 / 13.80 लाख
केन विल्यम्सन / हैदराबाद / 14 कोटी / 216 / 6.48 लाख
मयांक अगरवाल / पंजाब / 12 कोटी / 196 / 6.15 लाख
रोहित शर्मा / मुंबई / 16 कोटी / 268 / 5.97 लाख
महेंद्रसिंग धोनी / चेन्नई / 12 कोटी / 232 / 4.47 लाख
इशान किशन / मुंबई / 15.5 कोटी / 418 / 3.70 लाख.









