जिल्हय़ातील कातकरी आदिवासी कोरोनापासून दूरच : लेप्टो, डेंग्यू, माकडतापही यांच्या नसतो गावी
- निसर्गानेच पुरवले आहे आदिवासींना संरक्षण कवच
- कातकऱयांची रोगप्रतिकार शक्ती आहे असामान्य
- आदिवासींना क्षुद्र म्हणणारेच नियतीपुढे ठरताहेत क्षुद्र
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हय़ात कोरोना बळी आणि बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असतानाच याच जिल्हय़ात निसर्गाच्या सानिध्यात व उघडय़ा आभाळाखाली वास्तव्य करून असलेल्या एकाही कातकरी आदिवासीचा कोरोना साधा केसही वाकडा करू शकलेला नाही. केवळ कोरोनाच नव्हे, तर यापूर्वी याच जिल्हय़ात अनेकांचे बळी घेतलेल्या माकडताप, लेप्टो, स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या साथींचीही या कातकऱयांसमोर काहीही मात्र चालू शकली नव्हती. शेवटी निसर्गाचा सन्मान राखणाऱयाना निसर्गच सांभाळतो, हेच त्रिवार सत्य आहे. स्वतःला ‘सुशिक्षित’ म्हणविणारे मात्र स्वार्थापोटी निसर्ग ओरबडत आहेत आणि ऑक्सिजन मिळत नाही, असे म्हणत इस्पितळांच्या दारातच किडय़ामुंग्यासारखे मरत आहेत.
निसर्ग हा खराखुरा परमेश्वर आहे. या परमेश्वररुपी निसर्गाचा जो आदर करतो, सन्मान करतो त्यास हाच निसर्ग आपले संरक्षण कवच पुरवतो. पण आज आपण स्वत:स विद्वान समजणारी मंडळी हे कधी समजणार? या विद्वानांकडे धन, दौलत, पैसा-अडका सर्व काही आहे. पण या मंडळींनी कधीही या निसर्गरुपी परमेश्वराचा सन्मान केलेला नाही. स्वत:च्या स्वार्थापाई निसर्गाचा जेवढा ऱहास करता येईल, तेवढा करायचा व आसुरी उपभोग घ्यायचा, एवढेच या लोकांना माहीत. जवळपास 99 टक्के समाज याच पठडीतला आहे. तर एक किंवा अर्धा टक्का असलेले आदिवासी मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी, सुविधा, औषधे नसतानाही शारीरिकदृष्टय़ा आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरले आहेत.
कृपादृष्टीही ‘त्याची’च
आपल्या जिल्हय़ात कातकरी आदिवासींची 523 कुटुंबे आहेत. कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, देवगड आणि कणकवली अशा पाच तालुक्यांतून मिळून 29 वस्त्या या कातकऱयांच्या आहेत. गावाच्या वेशीबाहेर व जंगल पायथ्याशी राहणारे हे कातकरी बागायतदार व शेतकऱयांकडे मोलमजुरीची कामे करतात. या छोटय़ाशा जिल्हय़ात जवळपास दीड हजार आदिवासी बांधव आहेत. यातील 80 टक्के बांधव आंबा व काजू बागा राखायचे काम करतात. शेतीच्या हंगामात कापणी, लावणीची कामे, घाटमाथ्यावर जाऊन उस तोडणी वगैरे कामे ही मंडळी करीत असतात. दिवसभर राबराब राबायचं, नदीतले मासे पकडायचे किंवा चिकन, रानभाज्या खायच्या व उघडय़ा आभाळाची चादर घेऊन शांत झोपायचं. पहाटे पाचला उठून दिवसाची सुरुवात करायची. आठ वाजता कामावर निघायचं. या दरम्यान यांची मुलं अनवाणी पायांनी रानावनात रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी भटकत असतात. मस्तपैकी नदीत डुबायचं, मासे पकडायचे, वस्तीवर एकत्र येऊन थोडाफार अभ्यास करायचा. सायंकाळी मोलमजुरी करून थकून-भागून वस्तीवर सर्व जेष्ठ मंडळी घरी आली की लगेच जेवण वगैरे करून रात्री आठ वाजताच निद्रेच्या आधीन व्हायचे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात माकडतापाच्या साथीने बांदा, दोडामार्गात अनेकांचे बळी गेले. पण तेथील आंबा, काजूंच्या बागांमध्ये वावरणाऱया एकाही कातकरी आदिवासीचा बळी गेला नाही वा त्याला लागणही झाली नाही. लेप्टोच्या साथीत शेतात वावरणाऱया अनेक शेतकऱयांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या शेतकऱयांकडे मजूर म्हणून वावरणाऱया एकाही कातकरी आदिवासीला लेप्टोची लागण झाली नाही. स्वाईन फ्लू, त्याचप्रमाणे डेंग्यूने देखील या जिल्हय़ात बळी घेतले. परंतु, या दोन साथीही या आदिवासींच्या केसालाही धक्का लाऊ शकल्या नाहीत.
ही काही जादू नव्हे. ही या आदिवासींवर निसर्गाने ठेवलेली कृपादृष्टी आहे. सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहाणाऱया, निसर्गाचा सन्मान राखणाऱया या खऱयाखुऱया निसर्गपुत्रांना स्वत: निसर्गरुपी परमेश्वराने अद्भूत अशी रोगप्रतिकारक शक्ती पुरविली असल्याने कोरोना, लेप्टो, माकडतापासारख्या जीवघेण्या साथींची मात्रा या आदिवासींजवळ चाललेली नाही. थोडाफार काही आजार वाटला, तर वनौषधींचे उत्तम ज्ञान या लोकांना असते. त्याचा आधार घेऊन ही मंडळी कोणत्याही आजारावर मात करतात व नेहमी ‘हेल्दी’ राहतात.
आपण निसर्गाचा सन्मान केव्हा राखणार?
इकडे जवळपास सर्वांनाच ए. सी., पंख्यांशिवाय चालत नाही. राहायला चांगली घरे हवीत, जेवण चमचमीत, हवे. वातावरणात थोडा जरी बदल झाला की, आपल्या शरीराचे संतुलन क्षणात बिघडते. मग आपण डॉक्टरांकडे धावतो. महागडी औषधे घेतो. आताच्या कोरोनाच्या या साथीत कधी कोणाचा मृत्यू होईल, काहीच सांगता येत नाही. मात्र या भीषण परिस्थितीत कातकरी आदिवासी मात्र अगदी निर्धास्त आहेत. आपल्या कामात व्यस्त आहेत. सुशिक्षित मंडळींपैकी अनेकजण या आदिवासींना तुच्छ मानतात. पण खऱया अर्थाने हीच मंडळी किती तुच्छ आहे, हे कोरोनाने दाखवून दिले आहे.
व्यसन हाच आजार!
या आदिवासींना एकच आजार, तो म्हणजे व्यसनाचा. दारू आणि तंबाखू ही दोन व्यसने त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असतात. या समाजातील महिला आणि पुरुष दोघेही दिवसभर राबराब राबून थकल्या-भागल्या शरीराचा क्षीण घालविण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मद्य प्राशन करतात. या दारुची नशा त्यांना गरिबीसोबत आलेली भूक विसरण्यास भाग पाडते. पण त्यामुळे दारू जास्त व अन्न कमी. यातून मग शरीर खंगते व भूकबळीमुळे या आदिवासींचे मृत्यू होतात. मात्र या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही साथजन्य आजाराने एखाद्या आदिवासीचा मृत्यू झाल्याचे ऐकिवात नाही. सुदैवाने सोशीत मुक्ती अभियानसारख्या संस्थांनी या आदिवासींमध्ये व्यसनमुक्ती अभियान राबवून जवळपास 60 टक्के व्यसनमुक्ती करण्यात यश मिळविले आहे.









