वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि त्याला थोपविण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱया जवळपास 40 कोटी लोक प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा नोकऱया आणि अन्य मिळकती करण्यात येणाऱया घटकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांच्या अहवालातून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे असंघटीत क्षेत्रातील लहान मोठी काम करणाऱया 40 कोटी लोक आता आहे त्यापेक्षा अधिक गरीब होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतात महामारीला आळा घालण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही ज्या देशात ही स्थिती हाताळण्याची संसाधनाची कमतरता आहे त्यात भारताचा समावेश होत असल्याचे म्हटले आहे.
जगातील 2.7 अब्ज कामगार अडचणीत
जगामध्ये दोन अब्जपेक्षा अधिक अनौपचारिक क्षेत्रात काम करत आहेत. जगात पाचमधील चार लोक (81 टक्के) लॉकडाउनमुळे प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असा अहवाल जिनिव्हामध्ये आयएलओकडून सादर केला आहे. भारत, नायाझेरिया आणि ब्राझीलमधील असंघटीत क्षेत्रात कार्यरत असणाऱया कामगारांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे सांगितले आहे.
भारतातील संघटीत कामगार
उपलब्ध माहितीनुसार भारतात जवळपास 90 टक्के लोक असंघटीत क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील 40 कोटी कामगारांच्या रोजगारावर बंदचा मोठा परिणाम होणार असल्याचा अंदाज मांडला आहे.