ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मुकेश अंबानी पाचव्या स्थानावर पोहचले आहेत. अंबानी यांनी प्रसिद्ध उद्योजक वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले आहे. ‘फोर्ब्स’ने ही यादी तयार केली आहे.
कोरोना संकतातही जगभरातील विविध कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याने रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ दिसून आली आहे. डिजिटल सेवा आणि जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 33 टक्के हिस्सेदारी फेसबुक आणि गुगलसह अन्य प्रमुख गुंतवणूकदारांना विकल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त झाली आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 75 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर्स आहे.रिलायन्सच्या डिजिटल उद्योगात 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याने मार्चपासून त्यांचे शेअर्स दुप्पट झाले आहे.
‘फोर्ब्स’ने तयार केलेल्या या यादीत ‘अॅमेझॉन’चे संस्थापक, सीईओ जेफ बेजॉस हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 185.8 अब्ज डॉलर्स आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेटस् आहेत. त्यांची संपत्ती 113.1 अब्ज डॉलर्स आहे. 112 अब्ज डॉलर्स संपत्तीसह ‘एलव्हीएमएच’चे बर्नार्ड अर्नोल्ट व त्यांचे कुटुंबीय तिसऱ्या क्रमांकावर तर चौथ्या स्थानावर ‘फेसबुक’चे सीईओ मार्क झुकेरबर्ग आहेत. त्यांची संपत्ती 89 अब्ज डॉलर्स आहे.