खड्डय़ात मिळणार अत्यंत मौल्यवान हिरे
राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणेच रशिया देखील रहस्यांनी भरलेला देश आहे. रशियातून येणाऱया प्रत्येक माहितीवर पुतीन यांची करडी नजर असते. याचमुळे मॉस्कोच्या बहुतांश हालचाली रहस्यमयच असतात. पूर्व रशियाच्या सायबेरिया भागात एक खाणींचे शहर आहे. आर्क्टिक सर्कलपासून सुमारे 450 किलोमीटर अंतरावरील या शहराचे नाव मिर्नी आहे.
हे शहर एका खुल्या हिऱयाच्या खाणीनजीक वसलेले आहे. ही खाण 1772 फुटांपेक्षा अधिक खोल असून याचा व्यास 3,900 फूट आहे. हा जगातील सर्वात मोठय़ा ‘खोदलेल्या खड्डय़ां’पैकी असून यात रहस्यमय प्रमाणात हिरे आहेत. हा खड्डा स्वतःच्या वर उडणारी कुठलीही गोष्ट खेचू शकतो असा दावा करण्यात येतो.

खांबांवर वसलेले पूर्ण शहर
मिर्नी शहरात राहणारी बहुतांश लोकसंख्या अलरोसा या एकाच कंपनीसाठी काम करते. येथे आकाराच्या हिशेबाने जगातील सर्वात मोठी हिऱयाची खाण आहे. या शहराची निर्मिती खांबांवर करण्यात आले आहे. कारण येथील जमीन वर्षातील 9 महिने पर्माफ्रास्टने आच्छादलेली असते. उन्हाळय़ात पर्माफ्रॉस्ट दलदलीत रुपांतरित होते आणि खांब लोकांच्या घरांना पाणी आणि चिखलापासून वाचवितात. हे शहर 1955 मध्ये वसविण्यात आले होते.
हिवाळय़ात गोठते द्रवरुपी इंधन
1957 मध्ये रशियाचा तत्कालीन प्रमुख स्टॅलिनने मिर्नी येथे हिऱयाची खाण निर्माण करण्याचे आदेश दिले होते. परंतु ओबडधोबड भाग आणि प्रतिकूल हवामान अडचणीचे ठरले होते. हिवाळय़ात मिर्नीमधील तापमान उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत खालावते. थंडीमुळे येथे वाहनांचे टायर फुटतात आणि द्रवरुपी इंधन गोठून जाते.
342.57 कॅरेटचा हिरा
खाणीच्या निर्मितीसाठी जेट इंजिन आणि डायनामाइटचा वापर करण्यात आला. 1960 पर्यंत खाणीचे संचालन सुरू झाले आणि पहिल्या दशकात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात हिऱयांचे उत्पादन मिळविले गेले. 342.57 कॅरेटचा फॅन्सी लेमन येलो डायमंड याच खाणीतून शोधण्यात आला होता. 2004 मध्ये ही खाण अचानक आणि आश्चर्यकारकपणे बंद झाली.









