लाइफलाइन एक्स्प्रेस : शस्त्रक्रिया विभागही उपलब्ध : मोफत उपचार होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने एक विशेष रेल्वेगाडी तयार करत इतिहास रचला आहे. भारतीय रेल्वेने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन तयार करून नवा विक्रम नोंदविल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. या हॉस्पिटल ट्रेनला लाइफलाइन एक्स्प्रेस नाव देण्यात आले आहे. या रेल्वेत एका रुग्णालयाप्रमाणे सुविधा आहेत. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे हॉस्पिटल ट्रेनची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
लाइफलाइन एक्स्प्रेस रेल्वे आसामच्या बदरपूर स्थानकावर तैनात आहे. या हॉस्पिटल ट्रेनमध्ये अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक आहे. यात 2 आधुनिक शस्त्रक्रिया विभाग आणि 5 ऑपरेटिंग टेबलसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात रुग्णांवर मोफत उपचाराची व्यवस्था आहे. रेल्वेकडून प्रसारित छायाचित्रांमध्ये यातील सर्व आधुनिक सुविधांचे दर्शन घडते. महामारीदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात रेल्वेस्थानकांवर ऑटोमॅटिक तिकिट चेकिंग मशीन समवेत अनेक सुविधांचा समावेश आहे. कोरोना संक्रमण काळात अत्याधुनिक होत चाललेल्या रेल्वेने मेडिकल असिस्टंट रोबोटसमवेत आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला आहे.