प्रतिनिधी / जोयडा
जगलबेट, शिंगरगाव ते उसोडा रस्त्यावर अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता खराब होत असून अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. लहान वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी जगलबेट, शिंगरगाव, वैजगाव, वाडा, दुर्गी, उसोडा, हिरेगाळी, बर्ची व दांडेली शहरातील नागरिक, वाहनचालक संघ व ग्राम पंचायत सदस्य यांनी जोयडा तालुका प्रशासनाकडे केले आहे.
जगलबेट शिंगरगाव ते उसोडा हा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून ट्रक, लॉरी व टिप्पर अशा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी आहे. तरीही लॉरी, ट्रक व टीप्पर चालक याकडे दुर्लक्ष करत या अरुंद मार्गाने वाहतूक करत आहेत. जोयडा सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रिज नं. 12 व शिंगरगाव-उसोडा क्रॉसजवळ लहान वाहन जाण्यासाठी कमान बांधावी. अवजड वाहनांवर पोलीस बंदोबस्त ठेवावा, दंड आकारणी करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.