ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची आतापर्यंत 12 लाख 1 हजार 933 जणांना बाधा झाली आहे. तर 64 हजार 716 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लाख 46 हजार 634 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.जगभरातील 195 देशांमधील ही आकडेवारी आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश आपापल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 13 हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिथे आतापर्यंत 3 लाख 11 हजार 357 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 8452 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त म्हणजेच 15 हजार 362 जण दगावले आहेत, तर 1 लाख 24 हजार 632 जणांना याची बाधा झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा फैलाव काहीसा कमी झाला होता. मात्र, बरे झालेल्या 10 टक्के कोरोनाग्रस्तांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने चीनमधील चिंता वाढली आहे.
भारतातही 3588 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 99 जण दगावले आहेत. तर 229 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.